मुंबई : महापौर रितू तावडे यांनी मुंबईतील बांगलादेशी फेरीवाल्यांना हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्याविरोधातील कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
नवनिर्वाचित महापौरांना केवळ बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे मुंबईत खोदून ठेवलेले रस्ते, न उचलला जाणारा कचरा, पादचारी मार्गांची दुरवस्था, मोकळ्या जागांवरील बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण, प्रदूषित हवा – पाणी आदी मुंबईतील नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर केला.
बांगलादेशी फेरीवाल्यांना अवैधरित्या जन्म प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या डॉक्टर व संबंधित आरोग्य अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही हाती घेण्याचे आदेश महापौर रितू तावडे यांनी यंत्रणांना दिले. आतापर्यंत ८ जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून २ वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले. उर्वरित फेरीवाल्यांविरोधातील सोमवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पदग्रहण केल्यापासून तावडे यांनी बांगलादेशी फेरीवाल्यांचा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र, तावडे यांच्या भूमिकेवर अनेकांकडून टीका केली जात आहे.
बांगलादेशी फेरीवाल्यांचा विषय केंद्र व राज्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. कदाचित महापौरांना वाटत असेल संबंधित खाती आपल्याकडेच आहे, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे कसे घुसले, ते भारताच्या एका टोकापासून भाजपशासित राज्यांतून मजल दरमजल करीत मुंबईत कसे काय येऊ शकले ? इतकी वर्षे ते इथे कसे काय राहिले ? राष्ट्रीय सुरक्षेतील अपयशासाठी जबाबदार कोण ? गुप्तचर यंत्रणा की प्रशासकीय अपयश ? आदी सवाल ठाकरे यांनी उपस्थित केले.
पाकव्याप्त काश्मीर घेणार अशा घोषणा भाजपकडून प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात करण्यात येतात. मात्र, आता बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नाही. जर मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर शिरले असतील, तर त्यांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर पाठवण्यात अपयश आले, हे केंद्र व राज्य सरकारने का लपवले ? राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.

