scorecardresearch

मुंबईला दिल्लीच्या दारात कटोरा घेऊन उभं करण्याचा डाव; BMC Budget वरून आदित्य ठाकरे आक्रमक

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

aditya thackeray

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी तब्बल ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकावरून शिवसेनेचे आमदार आदिय ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि आयुक्तांवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, “हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी बनवलेला नसून हे वर्षा बंगाल्यातून छापून आलेला कंत्राटदारांचा अर्थसंकल्प आहे, हे त्यांच्या मित्रांचं बजेट आहे.”

आदित्य ठाकरे म्हणाले की, “कंत्राटदारांसाठी अर्थसंकल्पातील आकडे फुगवले आहेत. कंत्राटदारांसाठी वाढीव पैसा दाखवायचा, कंत्राटदारांसाठीच वाढीव पैसे खर्च करायचे हा राज्यातल्या घटनाबाह्य सरकारचा हेतू आहे. भरसाठ खर्च दाखवून मुंबई महापालिका तोट्यात दाखवून मुंबईला दिल्लीच्या दरवाजात कटोरा घेऊन उभं करायचं हा या सरकारचा डाव आहे. दिल्लीसमोर मुंबईची मान झुकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

आदित्य ठाकरे यांनी बजेटमध्ये मांडलेल्या खर्चांवर आणि तरतुदींवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ठाकरे म्हणाले की, “अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या फंडातले पैसे सौंदर्यीकरणासाठी वळवले आहेत. अर्थसंकल्पात सौंदर्यीकरणासाठीचे १,७०० कोटी हे मागच्या नगरसेवकांच्या फंडातून वळवले गेले. हा अधिकार आयुक्तांना कोणी दिला. ते स्वतःहून असे पैसे वळवू शकतात का?” असा सवालही आदित्य यांनी उपस्थित केला.

आय़ुक्तांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “अनेकदा आयुक्त हेच वेगवेगळे प्रस्ताव मांडतात आणि स्वतःच ते अपूव्ह करतात. परंतु मुळात त्यासाठी स्थायी समितीची परवानगी लागते. मुंबईत आता लोकशाही राहिलेली नाही.”

हे ही वाचा >> BMC Budget : यंदा कोणतीही करवाढ नाही! निवडणुकीच्या तोंडावर पालिकेकडून मुंबईकरांना दिलासा

नव्या प्रकल्पांशिवाय बजेट ५० हजार कोटींच्या पुढे कसं गेलं? : आदित्य ठाकरे

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, “मुंबईच्या विकासासाठी पालिकेने काही सूचना मागवल्या होत्या. त्यात आम्ही सूचवलं होतं की, मुंबईत सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करायला हवं. नव्या प्रकल्पांची सध्या आवश्यकता नाही. ही सूचना पालिकेने मान्य केली असल्याचं बजेटवरून दिसतं. कारण यंदाच्या अर्थसंकल्पात एकही नवा प्रकल्प दिसत नाही. असं असलं तरी पालिकेचं बजेट मात्र ५० हजार कोटींच्या पुढे गेलं आहे. नव्या प्रकल्पांशिवाय बजेट इतकं वाढलं कसं?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 17:53 IST