Aditya Thackeray BMC Mayor Ritu Tawade Controversy : अभिनेत्री दिया मिर्झाने प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी तयार केलेला व्हिडीओ हटवण्यात आल्याच्या प्रकरणावरून मुंबई महानगरपालिकेवर टीका होत आहे. हा व्हिडीओ पुन्हा शेअर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहेत. तसेच, भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याची जाणीव राजकीय नेत्यांनी ठेवायला हवी, असेही न्यायालयाने सुनावले. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनासह महापौर रितू तावडे यांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महापालिकेच्या कारभारावर आदित्य ठाकरेंचा सवाल

महानगरपालिकेनेच स्वतः अभिनेत्री दिया मिर्झा, माधुरी दीक्षित आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना पत्र पाठवून प्रदूषण जनजागृतीसाठी असे व्हिडीओ तयार करण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर दिया मिर्झा यांचा व्हिडीओ नेमका कोणाच्या आदेशाने हटवण्यात आला, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

“ती पत्रे मीदेखील पाहिली आहेत. महानगरपालिकेत नेमकी काय सर्कस चालली आहे, हे लोकांना समजायला हवे,” असे ते म्हणाले. महापौरांच्या गाडीवरील लाल दिव्याची मागणी, निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी प्रस्तावित असलेला खर्च आणि सोशल मीडियाच्या खर्चावरून त्यांनी महापौरांना धारेवर धरले. प्रत्येक प्रकरणात बातम्या समोर आल्यावर आपल्याला काहीच माहिती नसल्याचे उत्तर दिले जाते, असा आरोप त्यांनी केला.

“शहरातील समस्यांऐवजी धर्म आणि जातीवर भर”

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरही यासंदर्भात पोस्ट केली. भाजपा ज्या प्रशासनाची जबाबदारी स्वीकारतो, त्याचे रूपांतर सर्कसमध्ये करतो, अशी टीका त्यांनी केली. मुंबई महानगरपालिकेत काही चुकीचे घडले की महापौर आणि त्यांचे वरिष्ठ प्रशासनाच्या कामाबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगतात, असे ते म्हणाले.

जगभरातील महापौर नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करतात, मात्र मुंबईच्या महापौरांचा भर त्यांच्या गाडीवरील लाल दिवा, निवासस्थानाचे नूतनीकरण आणि आता जनजागृतीसाठी तयार केलेल्या व्हिडीओमधील एका नागरिकाच्या धर्मावर असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिया मिर्झा यांच्या व्हिडीओच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरून राजकीय वाद निर्माण झाला असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा व्हिडीओ पुन्हा शेअर केला जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.