Aaditya Thackeray questions BJP on Bangladeshi infiltration: आदित्य ठाकरे यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्यावरुन भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. नवनिर्वाचित महापौरांना देखील मुंबईतील नागरी प्रश्नांपेक्षा बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न अधिक सतावत असल्याचे म्हणत ठाकरेंनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक निवडणुकीत पाकव्याप्त काश्मीर घेऊ सांगणारे भारतात बांगलादेशी घुसले कसे याचे उत्तर देऊ शकत नाहीत, अशी टीका करत आदित्य यांनी भाजपासमोर चार प्रश्न देखील उपस्थित केले.
महापौरांवर टीका
शिवसेना नेते (उद्धव ठाकरे) आदित्य ठाकरेंनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले. नवनिर्वाचित महापौर (रितू तावडे) यांना मुंबईतील नागरी प्रश्नांपेक्षा बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न अधिक सतावयोत असे म्हणत आदित्य ठाकरेंनी महापौरांवर टीका केली. खोदून ठेवलेले रस्ते, कचरा, पादचारी मार्गाची दुरावस्था, प्रदूषित पाणी, हवा आणि अतिक्रमण अशा काही समस्या त्यांनी उपस्थित केल्या.
घुसखोरीचा प्रश्न केंद्र आणि राज्य गृह मंत्रालयाच्या अखात्यारित येतो असे म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपा सरकारच्या कार्यक्षमेवर प्रश्न उपस्थित केले.
आदित्य ठाकरेंचे भाजपाला चार प्रश्न
१) बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे कसे घुसले?
२) देशाच्या एका टोकापासून भाजपाशासित राज्यातून प्रवास करत मुंबईत कसे आले?
३) केंद्रात दशकापासून भाजपा सरकार असताना ते (घुसखोर) इतकी वर्षे कसे राहिले?
४) या राष्ट्रीय सुरक्षेतील अपयशाला कोण जबाबदार? गुप्तचर यंत्रणा का प्रशासन?
असे प्रश्न उपस्थित करुन आदित्य ठाकरे यांनी याचे उत्तर भाजपा असल्याचे म्हटले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारला सवाल
प्रत्येक निवडणुकीत पीओके घेणार असे सांगणारे बांगलादेशी घुसले कसे यांचे उत्तर देता येत नाही, अशी टीका करताना भाजपा प्रत्येक अपयशाचा इव्हेंट करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. घुसखोरांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर पाठविण्यात अपयश आल्याचे केंद्र आणि राज्य सरकारने का लपवले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

