मुंबई : राज्यातील लाखो बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि विविध लाभांचे अर्ज प्रलंबित आहेत. या गरीब, गरजू कामगारांचे प्रश्न सोडविले जात नाहीत. त्याचवेळी त्यांना भांडी व अन्य साहित्यवाटपाच्या योजनांमध्ये अधिकाऱ्यांना जास्त रस असल्याचे आढळून आले आहे. या वाटपापेक्षा गरीब कामगारांचे आर्थिक प्रश्न, मृत्यू लाभ आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याला प्राधान्य द्या. बांधकाम कामगांराचे प्रश्न न सोडवणाऱ्या अधिकाऱ्यांना जनाची नाही तर किमान मनाची लाज वाटली पाहिजे, असा संताप कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला.

राज्यातील बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर फुंडकर यांनी नुकतीच एक बैठक कामगार आयुक्त कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन यांच्यासह राज्यातील सर्व कामगार अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्यात बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी सुमारे एक कोटी एक लाख ६७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सुमारे ८७ लाख ९१ हजार अर्ज मंजूर झाले आहेत. १३ लाख ७१ हजार नोंदणी अर्ज प्रलंबित आहेत.

 नूतनीकरणासाठी ७० लाख ३५ हजार अर्ज आलेले आहेत. त्यापैकी ४२ लाख ८५ हजार मंजूर झाले आहेत, तर नऊ लाख ९५ हजार अर्ज आजही प्रलंबित आहेत. मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यामध्ये अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास पात्र वारसांना आर्थिक मदत, अंत्यविधीसाठी सहाय्य, दिव्यांगत्वासाठी मदत, वैद्यकीय उपचार, विवाहासाठी अर्थसहाय्य, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत, घरकुल सहाय्य, कौशल्य विकास आणि विमा संरक्षण अशा लाभांचा समावेश आहे.

गर्भवती महिला कामगारांसाठी तसेच कामगारांच्या कुटुंबीयांसाठीही विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे. या लाभांसाठी अर्ज करूनही कामगारांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असतात. मृत्यू लाभ आणि अन्य आर्थिक मदतीची प्रकरणे वेळेत निकाली निघत नाहीत अश्या तक्रारी कामगार संघटनांनी केलेल्या आहेत. साहित्यवाटपाच्या योजनांमध्ये अधिकाऱ्यांकडून तत्परता दाखवली जाते. कामगारांच्या अन्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. काही प्रकरणांत आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयाबाबतही तक्रारी आहेत. त्याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याचे फुंडकर यांनी सांगितले. साहित्य वाटपात जेवढी तत्परता दाखवली जाते. तेवढी तत्परता अन्य लाभ देताना दाखवली जात नाही. गरीब बांधकाम मंजूरांना त्रास देणाऱ्यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात फुंडकर यांनी आपला संताप व्यक्त केला. नोंदणी, नूतनीकरण, दिव्यांग लाभ आणि मृत्यू लाभांची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश फुंडकर यांनी दिले.