असहिष्णुतेच्या मुद्दय़ावरून देशभरात निदर्शने; कॉँग्रेसकडून पाठराखण
देशात असहिष्णुता वाढते आहे, हे विधान काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खानने केले होते तेव्हा त्याच्यावर चहूबाजूंनी टीका झाली होती. या वादंगाचा धुरळा खाली बसतो न् बसतो तोच पुन्हा एकदा आमिर खानने दिल्लीत झालेल्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ या पुरस्कार सोहळ्यात वाढत्या असहिष्णुतेबाबत शाहरूखची री ओढली. आमिर एवढेच बोलून थांबला नाही तर असहिष्णुतेच्या वाढत्या घटनांमुळे चिंतित होऊन पत्नी किरणने देश सोडण्याविषयीही विचारणा केली होती, असेही त्याने पुढे सांगितले. आमिरच्या या वक्तव्यावरून देशभरातून टीकेची ‘दंगल’ उसळली आहे. खुद्द बॉलिवूडमधील त्याच्या सहकाऱ्यांनीही त्याला धारेवर धरले आहे.
दरम्यान, आमिरविरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. तर कॉंग्रेसने मात्र आमिरची पाठराखण केली आहे.
आमिर खानच्या या वक्तव्यावरून ‘अतुलनीय भारत’ची जाहिरात करणाऱ्या आमिरसाठी ‘भारत असहिष्णू’ कधी झाला, असा प्रतिप्रश्न करत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्याच्यावर जोरदार टीका के ली आहे. या सात ते आठ महिन्यांच्या कालावधीतच ‘सत्यमेव जयते’ आणि ‘अतिथी देवो भव’चे गुणगान करणाऱ्या आमिरला देश एकदम असहिष्णू झाल्याचे वाटायला लागल्याबद्दल खेर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. याच देशाने आमिरला घडवले असून यापेक्षाही प्रतिकूल अशा परिस्थितीतही तू दिवस काढलेस, याबद्दल कधीतरी किरणला सांगितले आहेस का, असे प्रश्न विचारणाऱ्या अनुपम खेर यांनी आमिरचे हे वक्तव्य म्हणजे राजकीय टीकाच असल्याचे अप्रत्यक्षपणे नमूद केले आहे. रविना टंडननेही आमिरचे नाव न घेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारण्यास तयार नसलेल्या लोकांचा हा पोटशूळ असल्याचा दावा करत आमिरचे वक्तव्य राजकीय असूयेपोटीच असल्याची टीका के ली आहे.
एकीकडे आमिरचे वक्तव्य हे राजकीय मानसिकतेतून होते असे मानणाऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे आमिर सहसा हार मानणाऱ्यांमधील नाही, असे म्हणत त्याच्या देश सोडण्याच्या वक्तव्याने दुखावलेल्या परेश रावल आणि ऋषी कपूरसारख्या अभिनेत्यांनी त्याला असा पळपुटेपणा न करण्याचा सल्ला दिला आहे. ही आपली मातृभूमी आहे, असे आमिरला वाटत असेल तर तो कधीही तिला सोडून जाणार नाही, असे परेश रावल यांनी म्हटले आहे. आमिर कधीच हार मानत नाही. त्याने देश सोडण्याची भाषा करण्याऐवजी देशातील परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. खरा देशभक्त असशील तर तू आपल्या मातृभूमीला अशा परिस्थितीत टाकून जाणार नाहीस. पळू नकोस, देशाच्या निर्माणासाठी प्रयत्न कर, असा सल्ला परेश रावल यांनी दिली आहे. जेव्हा समाजात चुकीच्या गोष्टी घडतात तेव्हा व्यवस्थेला बदलाची गरज असते, बिघडलेल्या व्यवस्थेची दुरुस्ती करा, त्यापासून पळून जाऊ नका, यातच खरी बहादुरी आहे, असे अभिनेता ऋषी कपूर यांनी आमिर तसेच किरण रावला सुनावले आहे.
आमिरवर बहुतांश नेटीझन्सनी टीकेची झोड उठवली असताना काहींनी मात्र, त्याला पाठिंबा देण्यासाठी ‘आय स्टँड विथ आमिर खान’ या नावाने नवा हॅशटॅग सुरू केला आहे. या हॅशटॅगवर आमिरने केलेल्या या वक्तव्यामागचे कारण समजून घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
काँग्रेस, इतर राजकीय पक्ष आणि चित्रपट उद्योगाशी संबंधितांपैकीच काहींनी आमिर खानची जोरदार पाठराखणही केली . सरकारवर टीका करणाऱ्यांवर देशविरोधक असा शिक्का सरकारने मारू नये अथवा सत्य बोलणाऱ्यांना धमकाविण्यात येऊ नये, असे मत आमिरच्या समर्थकांनी व्यक्त केले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आमिर खानचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

आमिरला देश सोडू देणार नाही – मुक्तार अब्बास नक्वी
सहिष्णुता भारतीयांच्या डीएनएमध्येच आहे. त्यामुळे अभिनेता आमिर खान याला देश सोडण्याची गरज नाही किंवा देश त्याला जाऊ देणार नाही, असे मत केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले आहे.
असहिष्णुतेबाबत झालेल्या राजकीय अपप्रचार आमिर खान बळी पडला असेल, मात्र त्यामुळे त्याला देश सोडून जाण्याची गरज नाही, अथवा देशही त्याला जाऊ देणार नाही. कारण सहिष्णुता भारताच्या डीएनएमध्ये आहे, असे नक्वी म्हणाले. आमिर खानला काळजी करण्याचे कारण नाही किंवा देश सोडण्याचा विचारही करण्याची गरज नाही. देशात असहिष्णुतेला थारा नाही, असेही नक्वी म्हणाले. अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला असतानाच राज्यमंत्री नक्वी यांनी तातडीने मत व्यक्त केले आहे.
भाजपचे प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी, भारत सोडून आमिर आणि त्याचे कुटुंबीय कोठे जाणार, भारतापेक्षा अधिक चांगला देश नाही, मुस्लीम देश आणि युरोपमध्ये काय स्थिती आहे, प्रत्येक ठिकाणी असहिष्णुता आहे, असे म्हटले आहे. आमिरचे वक्तव्य हे देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसने रचलेले ‘राजकीय षडयंत्र’ असल्याचा आरोप भाजपने केला.

भारत सर्वात सहिष्णु – व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली : काही लोक दिशाभूल करत आहेत तर काही लोकांची दिशाभूल झाली आहे. कोण कोणत्या प्रकारात मोडतो ते मी सांगू इच्छित नाही. भारतातील परिस्थिती अन्य देशांपेक्षा चांगली आहे. भारतात खूप सहिष्णुता आहे. देशातील नागरिक सहिष्णु आहेत, असे भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

आमिरपेक्षा महाडिकांचा प्रश्न महत्त्वाचा- पवार
सातारा : आमिर खान काय म्हणाला, त्या पेक्षाही मला शहीद संतोष महाडिक यांच्या कुटुंबीयांचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो, असे शरद पवार यांनी आमिर खानबाबतच्या प्रश्नावर सांगितले. शहीद संतोष महाडिक यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पवार आज सातारा दौऱ्यावर आले होते. या वेळी महाडिक कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले .

अन्य प्रश्न अधिक महत्त्वाचे – मुख्यमंत्री
सोलापूर : आमिर खान याच्या विधानाची आपण दखल घेणार नाही. त्याच्या वक्तव्यापेक्षा इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.  मंगळवारी दुपारी फडणवीस सोलापुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत नोंदवले.