मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकीत उमेदवारी दाखल करताना विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी घटनात्मक पदाचा दुरुपयोग करत पोलीसांकरवी अडथळे आणले, अशी तक्रार जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि आम आदमी पक्षाने महापालिका उपायुक्तांकडे केली आहे. संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही तपासावे आणि राहूल नार्वेकर व निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीपूर्वी ‘आप’च्या उमेदवार मार्गारेट दा कोस्टा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित होत्या. त्यांनी अनामत रक्कम भरली होती. त्यांना टोकन देण्यात आले होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन सूचना दिल्या की, इतर कोणत्याही उमेदवाराला दालनात प्रवेश देऊ नये. त्यामुळे ‘आप’च्या उमेदवाराचा अर्ज सादर करणे शक्य झाले नाही, असे ‘आप’च्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन -शर्मा म्हणाल्या.
‘मी जनता दलाच्या उमेदवारांचा अर्ज सादर करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा नार्वेकर यांनी ‘तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून कामे करवून घेता आणि इथे आमच्याविरोधात लढता काय’, अशी दमबाजी केली. आम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनात प्रवेश दिला नाही. यासंदर्भात राज्य निवडणूक अयोगाकडे तक्रार करण्यासाठी गेलो होतो. मात्र आयोगाने पालिका उपायुक्तांकडे तक्रार देण्यास सांगितले. वाघ यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यांनी सीसीटीव्ही तपासून निर्णय देईन, असे सांगितल्याचे माजी खासदार व बंजारा समाजाचे नेते हरीभाऊ राठोड म्हणाले.
गर्दी आणि गोंधळ पाहता निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या सहाय्यकांनी सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करायला हवे होते. उमेदवारांचे अर्ज स्वीकारायला हवे होते आणि सुरळीत प्रवेशासाठी परिसर मोकळा करायला हवा होता. मात्र, राहुल नार्वेकर यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात जाण्यापासून रोखल्याचा दोन्ही नेत्यांनी आरोप केला आहे. ए’ वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव हे आप व जनता दलाच्या आरोपांमुळे चांगलेच वादात सापडले आहेत. राहूल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य कुलाब्यातील प्रभागांमधून निवडणूक रिंगणात आहेत. ‘
नार्वेकर व भाजपवर गंभीर आरोप
- १. मुंबई महापालिका आणि राज्य निवडणूक आयोग हे भाजपच्या ताब्यातील बाहुले आहेत.
- २. राहूल नार्वेकर आणि त्यांचे कुटुंब मुंबईतील ‘ए’ वॉर्डला आपली ‘जहागीर’ समजतात.
- ३. तक्रार करूनही सीसीटीव्ही फुटेज दिले जात नाही. आम्हाला समजले आहे की, सीसीटीव्ही फुटेज गहाळ केले आहे.
- ४. मुंबई महापालिका निवडणूक भाजपने ‘हायजॅक’ केली आहे.
- ५. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका न घेता भाजप जिंकल्याचे जाहीर करावे.
