वादग्रस्त ट्विटप्रकरणी गायक अभिजित भट्टाचार्य गोत्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण, अभिजितविरोधात मुंबई सायबर सेलमध्ये सोशल मीडियावर अपशब्द वापरून समाजात जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रिती मेनन यांच्या फिर्यादीवरून अभिजितविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अभिजित याने पत्रकार स्वाती चतुर्वेदी आणि जनताकारिपोर्टर डॉट कॉमचे मुख्य संपादक रिफात जावेद यांच्याविरोधात अभिजितने वादग्रस्त ट्विट केले होते. चेन्नईतील इंजिनिअर तरुणाच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुस्लिम असल्याचा दावा करणारे ट्विट अभिजितने केले होते. अभिजितच्या या ट्विटवर स्वाती चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला होता. अभिजित समाजात धार्मिक तेढ निर्माण करून कायदा-सुव्यवस्थेत अडथळा आणत असल्याचे ट्विट करून स्वाती चतुर्वेदी यांनी हे ट्विट मुंबई पोलिसांना मेन्शन देखील केले होते. अभिजितवर कारवाईची मागणी चतुर्वेदी यांनी केली होती. यावर अभिजित यांनी स्वाती चर्तर्वेदी यांच्याविरोधात अश्लिल शब्दात गरळ ओकली होती. अभिजित यांच्या ट्विटवर चहुबाजूंनी टीका देखील करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याप्रकरणाची दखल घेत अभिजितविरोधात गुन्हा दाखल केला आहे.