पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे तीव्र दु:ख झाले असून, भविष्यात ‘आप’चा भाजप आणि काँग्रेस होऊ नये, असे मनापासून वाटते, अशी प्रतिक्रिया पक्षाचा राजीनामा दिलेल्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन टीम’शी बोलताना दिली.
त्या म्हणाल्या, “पक्षाच्या यशात प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान आहे. महाराष्ट्रातील ‘आम आदमी’ने पक्षाला यश मिळवून देण्यासाठी अतोनात कष्ट घेतले. त्यामुळे सध्या पक्षात सुरू असलेल्या वादामुळे तीव्र दु:ख होते.” पक्ष योजलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत नसेल तर अन्य पक्ष आणि ‘आप’ यामध्ये फरक तो काय? असा सवाल देखील दमानिया यांनी यावेळी उपस्थित केला. पक्षातील सद्यस्थितीने माझ्यासकट महाराष्ट्रातील ‘आप’चा प्रत्येक कार्यकर्ता व्यथित झाला असून, यासाठी जे जे कारणीभूत आहेत त्यांनी सर्वांनी माफी मागावी, अशी प्रामाणिक इच्छा असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी सरकार स्थापन करण्यासाठी गेल्या वर्षी काँग्रेसचे सहा आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पक्षाच्या एका माजी आमदाराने एक ध्वनिफीत जाहीर करून केला. या प्रकरणानंतर केजरीवाल यांना तत्त्वांसाठी पाठिंबा दिला होता, घोडेबाजार करण्यासाठी नाही, असा आरोप करीत अंजली दमानिया यांनी पक्षाला रामराम ठोकत असल्याचे ट्विट केले होते.