मुंबई : आरे परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतरित्या बांधलेल्या प्रार्थनास्थळावर आरे प्रशासनामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. संबंधित प्रार्थनास्थळ ७० वर्षे जुने असल्याचा दावा करण्यात येत होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. काही अनधिकृत प्रार्थनास्थळेही त्यात जमीनदोस्त करण्यात आली आहेत. नुकतेच आरे येथील एक प्रार्थनास्थळ जमीनदोस्त करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपूर्वी काही लोकांनी विश्वस्त मंडळाची स्थापना करून आरेमध्ये प्रार्थनास्थळ बांधले होते.

विशेष म्हणजे आरे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर प्रार्थनास्थळाचे बांधकाम करण्यात आले होते. यापूर्वीही दोन वेळा त्यावर तोडक कारवाई करण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, त्यांनतर नव्याने बांधकाम करण्यात आले. आरे प्रशासनाने प्रार्थनास्थळाची इत्यंभूत माहिती गोळा केली. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित प्रार्थनास्थळ अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनतर प्रशासनाने संबंधितांना बांधकाम हटविण्याबबात नोटीस बजावली. मात्र, सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर निष्कासनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार पोलिसांनाही पत्र पाठविण्यात आले. त्यांनतर मंगळवारी प्रार्थनास्थळ जमीनदोस्त करण्यात आले. निष्कासीत करण्यात आलेले प्रार्थनास्थळ ७० वर्ष जुने असल्याचे माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, एआयएमआयएमचे नेता वारिस पठाण यांनी या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. कारवाईदरम्यान त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संताप व्यक्त केला. तसेच, आरेच्या परिसरात अन्य ४०० प्रार्थनास्थळे असून त्यावर का कारवाई करण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संविधान, कायदे सर्वांसाठी एक असून केवळ विशिष्ट समाजाच्या प्रार्थनास्थळावर कारवाई करणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.