मुंबई…आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत अंदाजे एक लाख ८० हजार अशी असलेली दैनंदिन प्रवासी संख्या मागील दोन महिन्यांपासून दोन लाखांचा पल्ला पार करून पुढे गेली आहे. मागील दोन महिन्यांपासून या मार्गिकेवरून अंदाजे दोन लाख ते दोन लाख ३० हजार दरम्यान दररोज प्रवासी करत आहेत. तर विसर्जनाच्या दिवशी २५ सप्टेंबरला २४ तास मेट्रो ३ मार्गिकेवरील सेवा सुरू होती, या २४ तासांत या मार्गिकेवरून २ लाख ४० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

मुंबईतील पहिली ३३.५ किमी लांबीची भुयारी मेट्रो मार्गिका ऑक्टोबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान तीन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा सेवेत दाखल झाला तेव्हा या मार्गिकेवरून दिवसाला केवळ २० हजार प्रवासी प्रवास करत होते. मात्र बीकेसी ते आचार्य अत्रे चौक असा दुसरा टप्पा सेवेत दाखल होऊन आरे ते आचार्य अत्रे चौक असा भुयारी मेट्रो प्रवास सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ होऊन ती ७५-८० हजारांपर्यंत गेली.

त्यामुळे या मार्गिकेवरील प्रतिसादावर प्रश्न उपस्थित झाला. पण तिसरा टप्पा, आचार्य अत्रे चौक ते कफ परेड टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर मात्र दैनंदिन प्रवासी संख्या वाढत गेली आणि दिवसाला एक लाख ८० हजार प्रवासी या मार्गिकेवरून प्रवास करू लागले. तर आता दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाखांचा टप्पा पार करून पुढे गेल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील (एमएमआरसी) अधिकाऱ्यांनी दिली. मागील दोन महिन्यांपासून प्रवासी संख्येत मोठी वाढ होत असून आता दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाख ३० हजारांपर्यंत जात असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो ३ मार्गिकेच्या सेवा कालावधीत रात्रीच्या वेळेत वाढ करण्यात आली होती. मात्र हा सुट्टीचा काळ असल्याने या मार्गिकेवरील प्रवासी संख्या स्थिर राहिली. दोन लाखांच्या पुढेच दैनंदिन प्रवासी संख्या होती. विसर्जनाच्या दिवशी, २५ सप्टेंबरला सकाळी ५.५५ वाजता मेट्रो ३ सेवेत दाखल झाली आणि रात्रभर सेवा सुरूच होती. तेव्हा या २४ तासांच्या कालावधीत या मार्गिकेवरून २ लाख ४० हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान मेट्रो ३ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या लवकरच तीन लाखांचा टप्पा पार करेल असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.