मुंबई : आरे वसाहतीतील वनक्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर टाकाऊ वस्तू आणि जुने फर्निचर आदी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. विशेषतः वन विभागाच्या कार्यालयाजवळील परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यात जुने पलंग, टेबल्स आणि इतर कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे आरेमधील या परिसराला हळूहळू कचराभूमीचे स्वरुप येवू लागले आहे. परिणामी, येथील पाड्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पर्यावरणप्रेमी दर रविवारी नित्यनेमाने आरे परिसरात स्वच्छता मोहीम राबवतात. स्थानिक पर्यावरणप्रेमी रविवार, १५ जून रोजी सकाळी आरेतील वनक्षेत्रात स्वच्छता करण्यासाठी गेले होते. परिसराची स्वच्छता करताना काही ठिकाणी त्यांना जुने पलंग, सोफा, गृहोपयोगी वस्तू आणि इतर कचरा फेकण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे पुन्हा एकदा वनक्षेत्रातील स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. पण नागरिक येथे घरातील टाकाऊ वस्तू फेकतात. हा परिसर कचराकुंडा नाही, अशी खंत ‘सेव्ह आरे’च्या अमरिता भट्टाचर्जी यांनी व्यक्त केली. नियमित स्वच्छता करूनही पुन्हा पुन्हा तेथे कचरा टाकण्यात येतो. स्थानिक प्रशासनाने आणि वन विभागाने यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
यापूर्वी आरे जंगलात विशेषतः आदिवासी पाड्यांजवळ वैद्यकीय कचरा टाकल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांना त्रास होत आहे. कचरा व्यवस्थापनाच्या अपुऱ्या सोयी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही समस्या वाढत आहे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
कचऱ्यामुळे निर्माण होणारे धोके
- प्लास्टिकच्या बाटल्या, फर्निचरचे साहित्य अशा वस्तूंमध्ये पाणी साचते आणि डेंग्यू, हिवतापाचा प्रसार करणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव होतो.
- सतत कचरा टाकण्यात येत असल्यामुळे वनक्षेत्राला कचराभूमीचे स्वरुप येण्याची शक्यता आहे.
- पावसात प्लास्टिक नाल्यांमार्फत दूरवर वाहून जाऊन पूरस्थिती निर्माण करू शकते.
- जुने फर्निचर (लाकूड, फोम, गादी इ.) अत्यंत ज्वलनशील असते.
- फर्निचरवरील प्लायवूड, गोंद, रंग यामधील रसायने प्राण्यांसाठी विषारी असतात. काही प्राणी उत्सुकतेपोटी ते चावतात, गिळतात, त्यामुळे पोटदुखी, विषबाधा किंवा मृत्यू होऊ शकतो.
नियमित साफसफाई करूनही सातत्याने तेथे कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. वनक्षेत्रात दिवसेंदिवस असाच कचरा टाकण्यात आला, तर एक दिवस या परिसराला कचराभूमीचे स्वरुप येईल. – अमरिता भट्टाचर्जी, कार्यकर्ता, सेव्ह आरे.