मुंबई : महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या हस्तक्षेपानंतर आणि राज्य विधिमंडळात वारंवार उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांनंतर अखेर गोरेगावमधील आरे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्त करण्यात आले. हे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेकडे ३० वर्षांसाठी सोपविण्यात आले आहे.
प्राथमिक उपचारांचा अभाव, रुग्णशय्यांची तुटपुंजी व्यवस्था, डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आदी समस्यांमुळे गोरेगावमधील आरे वसाहतीतील रुग्णालय गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णशय्येवर होते. या रुग्णालयाचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी काही दिवसांपासून जोर धरू लागली होती. पूर्वी लहान मुले आणि गर्भवतींचे या रुग्णालयात लसीकरण करण्यात येत होते.
मात्र, गेली अनेक वर्षे या रुग्णालयात लसीकरणही बंद झाले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. येथील रुग्णांना उपचारांसाठी गोरेगावमधील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर गाठावे लागते. रुग्णाला तेथे नेण्यासाठी एक तास लागतो. अनेक वेळा आरे परिसरात वाहतुकीची सुविधा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना खांद्यावरून रुग्णालयात न्यावे लागते.
दरम्यान, आरे दुग्धालयातील कामगारांसाठी आरे रुग्णालय बांधण्यात आले होते. आरे वसाहतीत सुमारे २७ आदिवासी पाडे असून परिसरात या रुग्णालयाखेरीज आरोग्य सेवा उपलब्ध नाही. अनेक वेळा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसतात. तसेच बहुतांशी रुग्णालय बंदच असते. स्थानिक रहिवाशांना आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधांचा रुग्णालयात अभाव आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने २०२२ मध्ये रुग्णालयाच्या वाईट स्थितीची स्वतःहून दखल घेऊन त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल दुग्धविकास विभागाला फटकारले होते. अखेर अता या रुग्णालयाची जबाबदारी पालिकेकडे सोपविण्यात आली आहे.
यासंदर्भात महापालिकेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. कागदपत्रे आदी बाबींची पूर्तता झाल्यानंतर पालिका रुग्णालयाच्या कामास सुरुवात करेल आणि लवकरच रुग्णालय आरेवासियांच्या सेवेत दाखल होईल. सूर्यकांत खटके, साहाय्यक कार्यकारी अधिकारी, आरे प्रशासन गेली अनेक दिवस रुग्णालयाचा प्रश्न रखडला होता. अखेरीस तो आता मार्गी लागला आहे.
रुग्णालय महापालिकेकडे सोपविण्यात आले हे योग्यच झाले. पालिकेने रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून स्थानिक रहिवाशांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी.- संजीव वल्सन, पर्यावरणप्रेमी, ‘सेव्ह आरे’ कार्यकर्ता