मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचं एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट; निलेश राणेंनी साधला निशाणा

“किमान ५ हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागणार”

संग्रहित छायाचित्र

आरेतील मेट्रो कारशेडच्या वादावर रविवारी पडदा पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजुरमार्ग होणार असल्याची घोषणा केली. राज्य सरकारनं मेट्रो कारशेडबद्दल घेतलेल्या निर्णयावरून विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी मेट्रो कारशेडच्या निर्णयावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य नसल्याचे स्पष्ट करत आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेशही मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनला दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.

आणखी वाचा- मेट्रो कारशेडसाठी समितीची कांजुरलाच होती पसंती, पण फडणवीस सरकारनं फेटाळली होती शिफारस

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर निलेश राणे यांनी ट्विट करत निर्णयावरून ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. “आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट. करोडो रुपये वाया जाणार, नवीन परवानग्या कधी मिळतील व मिळतील की नाही माहीत नाही, कारण ती जमीन भुसभुशीत (खारफुटी सारखी) आहे. किमान ५ हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागणार… आधीचे पैसे गेले,” असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

आणखी वाचा- आरे कारशेड : “फडणवीस सरकारने रात्रीच्या अंधारात शेकडो झाडांची कत्तल अतिशय विनम्रतेने केलेली”

‘१०० कोटी वाया जाणार नाहीत’

“आरेमध्ये कारशेडसाठी बांधलेली इमारत आणि अन्य कामांवर १०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु, ही इमारत इतर कारणांसाठी वापरता येईल. त्यामुळे झालेला खर्च वाया जाणार नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडची घोषणा करताना स्पष्ट केले होतं. “आरेमधील ६०० एकर जागा शासनाने जंगल म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता कारशेडसह परिसरातील आणखी २०० एकर जागाही वन म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे. मात्र, तेथील आदिवासी पाडे आणि तबेल्यांना हात लावणार नाही”, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aarey metro carshed aarey forest maharashtra cm uddhav thackeray nilesh rane aditya thackeray bmh