मुंबई : सरकारने २०४७ पर्यंत पूर्णपणे आत्मनिर्भर नौदल उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आज साठहून अधिक युद्धनौका भारतातच बांधल्या जात असून ‘खरेदीदार नौदल’ ते ‘निर्माता नौदल’ असा मोठा बदल घडून आला आहे. जहाजबांधणीतील ‘फ्लोट, मूव्ह आणि फाइट’ या तीन टप्प्यांत स्वदेशीकरण मोठ्या प्रमाणावर साध्य झाल्याचे नौदलाचे माजी प्रमुख आर. हरी कुमार यांनी सांगितले. सागरी क्षेत्र, नौदलाचे कार्य आणि ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत आत्मनिर्भर नौदलाकडे झालेली वाटचाल यावेळी हरी कुमार यांनी सविस्तरपणे मांडली.
समुद्र, सागरी व्यापार आणि नौदलाची भूमिका याबाबत देशात अजूनही पुरेशी जाणीव नाही. भविष्यातील आर्थिक, तांत्रिक आणि सामरिक प्रगती समुद्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, असे सांगून नौदलाचे माजी प्रमुख आर. हरी कुमार यांनी सागरी क्षेत्र, नौदलाचे कार्य आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत आत्मनिर्भर नौदलाकडे झालेली वाटचाल सविस्तरपणे मांडली.
पृथ्वीचा सुमारे ७० टक्के भाग महासागरांनी व्यापला आहे. जगातील ९० टक्के व्यापार समुद्रमार्गे होतो आणि ९९ टक्के इंटरनेट डेटा समुद्राखालील केबल्समधून वाहतो. तसेच समुद्रमार्गे वाहतूक ही सर्वाधिक ऊर्जा-कार्यक्षम असल्याचे उदाहरण देत सागरी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. नौदलाने शैक्षणिक संस्था, उद्योग, डीआरडीओ आणि स्टार्टअप्स यांच्याशी सहकार्य करून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. लष्करी गरजांमधून विकसित झालेले तंत्रज्ञान पुढे नागरी क्षेत्रात उपयुक्त ठरत असल्याचे सांगून त्यांनी इंटरनेट आणि कंटेनर प्रणालीची उदाहरणे दिली. त्यामुळे तरुणांनी नवकल्पनांद्वारे नौदल आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय हितांचे संरक्षण, संवर्धन, प्रोत्साहन आणि पाठपुरावा ही नौदलाची चार प्रमुख कामे आहेत. देशाची अर्थव्यवस्था वाढेल तशी व्यापार वाढणार आहे. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी नौदलावर आहे. इंधनपुरवठा, व्यापारमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी नौदल चोवीस तास कार्यरत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत हा प्राचीन काळी सागरी राष्ट्र होता. पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय महासागर हा सर्वाधिक वापरला जाणारा महासागर होता. मात्र कालांतराने आपण समुद्राकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम म्हणून परकीय सत्तांकडून देश जिंकला गेला. ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी भारताचा जागतिक जीडीपीतील वाटा २७ टक्के होता, जो स्वातंत्र्याच्या वेळी केवळ ३ टक्क्यांवर आला, असे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या “जलमेव यस्य, बलमेव तस्य” या विचारांचा उल्लेख करत त्यांनी सागरी शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले.
