मुंबई : धारावीमधील एका रस्त्याच्या कडेला बेवारस अर्भक सापडले असून अज्ञात व्यक्तीने ते तेथे टाकून पळ काढल्याचा संशय आहे. हे अर्भक मृत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला अर्भक फेकल्याची गेल्या पाच दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश पाटकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारावी टी जंक्शन येथील कलानगरवरून शीवकडे जाणाऱ्या मार्गाच्या शेजारी गुरूवारी हे अर्भक सापडले. अर्भकाच्या मृत्यूनंतर विल्हेवाट लावण्यासाठी तेथे फेकण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे भादंवि कलम ३१८ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अर्भकाचा जन्म नुकताच झाल्याचा संशय असून त्याच्या मृत्यूचे कारण वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकेल. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने धारावी पोलीस याप्रकरणाचा तपास करीत आहेत.

हेही वाचा >>>ऑनलाइन फसवणुकीसाठी बँक खातेधारक जबाबदार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

अंधेरीतही दोन दिवसांचे अर्भक सापडले होते

अंधेरी येथे दोन दिवसांचे बाळ रस्ताच्या कडेला सापडले होते. या बाळाला जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बाळाला रस्त्यात सोडून पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तीरोधात वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.वर्सोवा पोलीस ठाम्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय नागनाथ मुद्राळे सहकारी पोलीस शिपाई पवार यांच्यासोबत शनिवारी परिसरात गस्त घालत होते. त्याच वेळी प्रदीपकुमार यादव यांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अंधेरीतील लोखंडवाला, बॅक रोडवर एक नवजात अर्भक सापडल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्यासह संबंधित पोलीस पथक तेथे रवाना झाले.

हेही वाचा >>>धारावी पुनर्वसनासाठी आतापर्यंत सव्वातीनशे एकर अतिरिक्त भूखंड!

घटनास्थळी गेल्यानंतर प्रदीपकुमार यादव पोलिसांना भेटले आणि त्यांनी नवजात बालकाची माहिती दिली. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले. या बाळाबाबत आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता त्याच्याविषयी कोणाला काहीच माहीत नव्हते. ते बाळ जिवंत असल्याने त्याला तातडीने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मुलगी झाल्यामुळे पालकांनी तिला रस्त्याच्या कडेला टाकून पलायन केले असावे, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस त्याद्वारे संशयीत आरोपीचा शोध घेत आहेत.