scorecardresearch

बाधितांमध्ये पोटाच्या तक्रारी; करोना रुग्ण पाच ते सात दिवसांमध्ये पूर्णपणे बरे

करोनाबाधित रुग्णांमध्ये ताप, खोकल्यासह प्रामुख्याने पोटाचे विकार आढळत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे.

corona-5
संग्रहित छायाचित्र

मुंबई: करोनाबाधित रुग्णांमध्ये ताप, खोकल्यासह प्रामुख्याने पोटाचे विकार आढळत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेप्रमाणे याही वेळेस बहुतांश रुग्णांमध्ये घशाला वरच्या बाजूलाच संसर्गाची बाधा होत असून रुग्ण पाच ते सात दिवसांमध्ये पूर्णपणे बरे होत असल्यामुळे चिंतेचे कारण नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. 

सध्या मुंबईसह राज्यभरात ओमायक्रॉनचा उपप्रकार बीए.२ आणि बीए.२.३८ याने बाधा झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. जूनपासून बीए.४ आणि बीए. ५ या उपप्रकारांच्या संसर्गाचे प्रमाणही वाढत आहे. ओमायक्रॉनचे हे उपप्रकार तुलनेने सौम्य असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये सुका खोकला, ताप यासह पोटाचे विकारही झाल्याचे आढळत आहे.

दुसऱ्या किंवा तिसऱ्या लाटेमध्ये करोनाबाधित रुग्णांमध्ये पोटाच्या विकारांचे प्रमाण तुलनेने कमी होते. आता काही रुग्णांमध्ये लक्षणांची सुरुवातच अतिसाराने होत असल्याचे दिसून आले आहे, असे सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले.  करोनाबाधित रुग्ण आणि अन्य विषाणूजन्य आजार यात सारखेपणा असला तरी करोनाबाधित रुग्णांमध्ये ताप हा तीव्र स्वरूपाचा असून याचा प्रभाव तीन दिवसांहूनही अधिक काळ असल्याचे आढळले आहे. दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे अतिसार, पोटदुखी रुग्णांमध्ये दिसून येत असल्याचे फॅमिली फिजिशियन डॉ. संजीवनी राजवाडे यांनी सांगितले.

रुग्णांमध्ये संभ्रम

पावसाळा सुरू झाल्याने पोटाचे विकार झाले असतील असा समज करून अनेकदा रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळले आहे. अतिसार किंवा अन्य पोटाच्या विकारांची तीव्रता वाढल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे डॉ. अडसूळ यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abdominal complaints victims corona patient recovers completely five seven days ysh

ताज्या बातम्या