मुंबई : देशभरात अखिल भारतीय कोटा, अभिमत महाविद्यालयांतील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. शुल्कावाढीवर नियंत्रण नसलेल्या अभिमत विद्यापीठांनी यंदाही वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शुल्कात अनिर्बंध वाढ केली आहे. राज्यातील चौदा अभिमत विद्यापीठांमधून वैद्यकीय पदवी घेण्यासाठी कोट्यावधींचे शुल्क मोजावे लागत असून बहुतेक सर्व विद्यापीठांचे शुल्क प्रत्येक वर्षासाठी २० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. विद्यापीठांनी यंदा लाख ते दोन लाख रुपयांनी शुल्क वाढवले आहे.

देशभरातील अभितम विद्यापीठांच्या शुल्काचे नियमन करण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. परंतु प्रत्यक्षात अद्यापही अभितम विद्यापीठांच्या शुल्कावर निर्बंध आलेले नाहीत. त्यामुळे या विद्यापीठाच्या आखत्यारीतील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या जागांचे शुल्क यंदाही वाढल्याचे दिसते आहे. यंदा वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल (नीट) चढा लागला. त्यामुळे प्रवेशाची स्पर्धा वाढली आहे. शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची खात्री नसलेल्या विद्यार्थ्यांची अभिमत विद्यापीठातील प्रवेशासाठी चाचपणी सुरू आहे. मात्र तेथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेपेक्षा आर्थिक सक्षमता प्रभावी ठरत आहे. राज्यातील अभिमत विद्यापीठांमधून डॉक्टर होण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे शुल्क मोजावे लागत आहे.

हेही वाचा : Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंद दरम्यान रेल्वे, बस सेवेवर काय परिणाम होणार? उद्धव ठाकरे म्हणाले, “उद्या…”

कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे शुल्क यंदा जवळपास अडीच लाखांनी वाढले आहे. त्यानुसार तेथे प्रतिवर्षी २३ लाख रुपये शुल्क आकारले जाणार आहे. डी. वाय. पाटीलच्या पुणे आणि नवी मुंबई येथील शुल्क साधारण २७ लाख रुपयांच्या घरात पोहोचले आहे. त्याशिवाय भारती विद्यापीठ पुणे, कृष्णा इन्स्टिट्यूटट कराड यांचे शुल्कही साधारण २३ लाख रुपये आहे. महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद आणि नवी मुंबई, वाशी, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, वर्धा यांचे शुल्क साधारण २१ लाख रुपये, दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे शुल्क साधारण २२ लाख, भारती विद्यापीठ सांगली येथील शुल्क साधारण २० लाख रुपये आहे. प्रवरा इन्स्टिट्यूटट, लोणी (साधारण १७ लाख) आणि महिलांसाठी असेलेले सिम्बॉयसिस वैद्यकीय महाविद्यालय (१० लाख) या दोनच अभिमत विद्यापीठांचे शुल्क २० लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

हेही वाचा : Mumbai Crime News: मुंबईत पित्याकडूनच दोन वर्षांच्या मुलाची विक्री, उत्तर प्रदेशात बाळाची विक्री केल्याचा संशय

राज्यातील महाविद्यालयांच्या शुल्काबाबत संदिग्धता

राज्यातील काही विनाअनुदानित महाविद्यालयांचेही शुल्कवाढीचे प्रस्ताव शुल्क नियमन प्राधिकरणाकडे सादर झाले आहेत. त्यामुळे राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे शुल्कही काही अंशी वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक महाविद्यालयाने त्यांच्या शुल्काचे तपशील संकेतस्थळावर जाहीर करावेत, असे आदेश शुल्क नियमन प्राधिकरणाने दिले आहेत. मात्र अद्यापही राज्यातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्काचे तपशील जाहीर झाले नसल्याची माहिती पालक आणि विद्यार्थ्यांनी दिली.