मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असल्याचा त्यांच्या कुटुंबीयांना संशय आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला आहे का ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी पोलिसांना केली. तसेच, आतापर्यंत या प्रकरणी केलेल्या तपासाचा आणि जमा केलेल्या पुराव्यांचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले असून तपास अद्यापही सुरू आहे. या खटल्यातील आरोपी अथवा संशयितांच्या मोबाईलच्या नोंदी (सीडीआर) तपासल्या आहेत का ? त्यातून काय माहिती पुढे आली ? असा प्रश्नही न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने पोलिसांना केला. तसेच, त्याचा तपशीलही सादर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास संबंधित परिमंडळाच्या उपायुक्तांच्या देखरेखीखाली केला जात आहे. त्यामुळे, उपायुक्त, याचिकाकर्ते आणि तपास अधिकारी यांनी संयुक्त बैठक घेऊन कुटुंबीयांचा संशय असलेल्या व्यक्ती आणि हत्येशी संबंधित अन्य पैलूंबाबत चर्चा करावी, असे आदेश खंडपीठाने पोलिसांना दिले. या याचिकेकडे प्रतिकूल म्हणून पाहू नका, अशी सूचनाही न्यायालयाने सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांना केली.

हेही वाचा – गुप्तधनातील सोन्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला अटक

हेही वाचा – अदानीची वीज महागली; मे महिन्यापासून इंधन अधिभारात वाढ

घोसाळकर याच्या हत्येचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करावा या मागणीसाठी त्यांची पत्नी तेजस्वी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अभिषेक यांच्या अकाली आणि अत्यंत संशयास्पद, गंभीर, निर्दयी, क्रूर, थंड डोक्याने केलेल्या हत्याकांडाचा कोणताही ठोस उद्देश शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे, तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे वर्ग करण्याची मागणी तेजस्वी यांनी केली आहे.