मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदयनगर वसाहतीचा पुनर्विकास गुजरातमधील विकासक करणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. कच्छमधील एमजीएन अॅग्रो प्रॉपर्टीज लि. ही कंपनी आणखी दोन विकासकांच्या मदतीने हा पुनर्विकास करणार आहे.

निविदेत उच्चतम ठरलेल्या मे. ओबेरॉय रिअल्टीने अचानक माघार घेतल्यामुळे या विकासकांच्या समुहाचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी मिळाल्यानंतर याबाबत शासनाकडून अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

३३ एकरवर पसरलेल्या या वसाहतीत ४८ इमारती असून त्यात तीन हजार ४१० कुटुंबीय राहतात. या इमारती जीर्ण झाल्या असून तातडीने पुनर्विकास आवश्यक आहे. या वसाहतीचा पुनर्विकास ‘कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट’ या धोरणानुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून राबविला जात आहे. त्यानुसार जारी करण्यात आलेल्या निविदांना पाचवेळा मुदतवाढ देण्यात आली.

अखेरीस निविदेतील अटी व शर्ती बदलण्यात आल्या. त्यानंतर मे. महिद्रा लाईफस्पेसेस डेव्हलपर्स, मे. एमजीएन अॅग्रो प्रॉपर्टीज (गुजरात), एनएनपी बिल्डकॉन (पुणे) आणि होनेस्ट शेल्टर्स (मुंबई) या विकासकांचा समूह तसेच मे. ओबेरॉय रिअल्टी अशा तीन विकासकांनी या पुनर्विकासात रस दाखविला. मात्र तांत्रिक तपासणी मे. महिंद्रा लाईफस्पेसेस डेव्हलपर्सची निविदा अपात्र ठरविण्यात आली.

उर्वरित दोन विकासकांमध्ये मे. ओबेरॉय रिअल्टीची निविदा सर्वोत्तम होती. त्यांनी रहिवाशांना ६४१ चौरस फुटाचे घर देऊ केले तर विकासकांच्या समुहाचे नेतृत्त्व करणाऱ्या मे. एमजीएन अॅग्रो प्रॉपर्टीजने ६३० चौरस फुटाचे घर देण्याची तयारी दाखविली. यासाठी आवश्यक ५१ टक्के रहिवाशांची सहमतीपत्रे प्राप्त न झाल्याने निविदा मागे घेत असल्याचे पत्र मे. ओबेरॉय रिअल्टीने म्हाडाला दिले व या निविदेतून माघार घेतली. या निविदेत शेवटपर्यंत राहिलेल्या मे. एमजीएन अॅग्रो प्रॉपर्टीजच्या समुहाच्या निवडीवर उच्चाधिकार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

मात्र त्यांनी पुनर्विकासात रहिवाशांना ६४१ चौरस फुटाचे घर द्यावे, असे स्पष्ट करण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

अभ्युदयनगरचा पुनर्विकास गेले अनेक वर्षे विविध कारणांमुळे गाजला आहे. या पुनर्विकासावरुन दोन बड्या विकासकांमध्ये हमरीतुमरीही झाली होती. अखेरीस अभ्युदयनगर महासंघाने पुनर्विकासाचा प्रयत्न सुरु केला. या प्रयत्नात मे. रुस्तमजी समुहाने बाजी मारली होती. परंतु त्यानंतर पुढे काहीच झाले नाही.

अखेरीस म्हाडाने या वसाहतीचा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीमार्फत पुनर्विकास करण्याचे निश्चित करुन निविदा जारी केली तेव्हा मात्र रुस्तमजी समुहाने त्यात भाग घेतला नाही. मे. ओबेरॉय रिअल्टीही या निविदेतून बाहेर पडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.