मुंबई: शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेल्या १६ सदस्यांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हावर निकाल देण्यात घाई केली आहे. आयोगाचा हा निकाल अन्यायकारक असून केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करावा आणि त्यावरील नियुक्त्या निवडणुकीच्या माध्यमातूनच करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा करीत निवडणूक आयोगाकडे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाची मागणी केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्याच आठवडय़ात शिंदे यांची मागणी मान्य करीत शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याचा आदेश दिला. त्यामुळे संतापलेल्या ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगावर पक्षपातीचा आरोप केला. निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी केली. पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरणे हा विरोधकांचा पूर्वनियोजित कट असून अशीच परिस्थिती उद्या अन्य पक्षांवरही आणू शकतात. त्यामुळे सन २०२४ची लोकसभा निवडणूक ही देशातील कदाचित शेवटची निवडणूक ठरू शकते असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.