कौटुंबिक हिंसाचाराच्या कारणास्तवही गर्भपातास परवानगी

गर्भात काही दोष नाही तसेच कोणतीही वैद्यकीय गुंतागुंतही नाही.

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

मुंबई : कौटुंबिक हिंसाचाराचा महिलेच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे एखादी महिला वैद्यकीय कारणास्तव गर्भपात करण्याची मागणी करू शकते, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.

वैद्यकीय गर्भपात कायद्यात (एमटीपी) मानसिक आरोग्य काय आहे हे स्पष्ट केलेले नाही. तरीही गर्भधारणा मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते या कारणास्तव महिला गर्भपातास परवानगी मागू  शकते. त्यामुळे घरगुती हिंसाचार सहन करणाऱ्या महिलेला गर्भधारणा कायम ठेवण्यास सांगणे हे त्या महिलेचे मानसिक आरोग्य धोक्यात घालण्यासारखे नाही का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. तसेच न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि  न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिकाकत्र्या महिलेला गर्भपातास परवानगी दिली.

गर्भात काही दोष नाही तसेच कोणतीही वैद्यकीय गुंतागुंतही नाही. परंतु घटस्फोट घेणार असल्याच्या कारणास्तव महिलेने गर्भपाताची परवानगी मागितली होती. सततच्या घरगुती हिंसाचारामुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे आपल्याला गर्भपात करण्यास परवानगी देण्याची मागणी या महिलेने याचिकेद्वारे केली होती. गर्भधारणा झाल्यानंतर पतीकडून वारंवार मारहाण केली जात असल्याचे कारण देऊन सतराव्या आठवड्यातच तिने गर्भपाताची तयारी दाखवली होती. परंतु न्यायालयात याचिका करेपर्यंत गर्भधारणेचा कालावधी चौवीस आठवड्यांहून अधिक झाला. वैद्यकीय सल्ल्यानंतर २४व्या आठवड्यात गर्भपाताची परवानगी आहे.

जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखालील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची वैद्यकीय तपासणी करून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर के ला होता. याचिकाकर्ती महिला सध्या मानसिक आजाराने ग्रस्त नसली तरी वैवाहिक कलहामुळे तिची मानसिक स्थिती स्थिर नाही. असे असले तरी वैवाहिक समुपदेशनाद्वारे या स्थितीवर मात करता येईल, असे अहवालात नमूद करण्यात आले होते.

अधिकार महिलेला

जागतिक आरोग्य संघटनेने निश्चिात केलेल्या मानसिक आरोग्याच्या व्याख्येचा आणि मुलाला जन्म देण्याच्या निर्णयाचा अधिकार महिलेला असल्याच्या निर्णयाचा न्यायालयाने याचिकाकर्तीला गर्भपातास परवानगी देताना प्रामुख्याने दाखला दिला. स्त्रीचा तिच्या शरीरावर आणि मुलाला जन्म देण्याबाबत निर्णय घेण्याच्या अधिकाराचा आहे. मुलांना जन्म देण्यावर नियंत्रण ठेवणे ही मूलभूत गरज आणि महिलांचा मूलभूत अधिकार आहे. ही बाब स्त्रियांच्या आरोग्याशी आणि सामाजिक स्थितीशी जोडलेली आहे. या प्रकरणाचा विचार केला तर महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने बाळाला जन्म दिला तर तिला पतीचा आर्थिक आणि भावनिक पाठिंबा मिळणार नाही. ती स्वत: कमावत नाही. अशा स्थितीत मुलाचे संगोपन करणे तिच्यासाठी अडचणीचे होईल. तिला गर्भपातास परवानगी न दिल्यास तिचे मानसिक आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळे घरगुती हिंसाचाराच्या कारणास्तव तिला गर्भपात करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Abortion is also allowed for reasons of domestic violence akp