नोंदणी कालावधी संपल्यानंतरही देणग्या स्वीकारून कर सवलतीच्या माध्यमातून सरकारची ५८ कोटी ८९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ६२ वर्षीय मुख्य आरोपीला गुजरातमधून अटक केली. त्याने कट रचून हा संपूर्ण प्रकार केल्याचा आरोप आहे.दीपक शहा (६२) असे अटक आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार, श्री अरविंदो इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड सायंटिफिक रिसर्च ट्रस्टने संशोधन संस्था म्हणून नोंदणी केली गेली होती. ही संस्था वैज्ञानिक संशोधन किंवा ‘विद्यापीठ, महाविद्यालय किंवा इतर संस्थांसाठी वैज्ञानिक संशोधनाचे काम करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली होती. प्राप्तिकर विभागाच्या तपासणीनुसार संस्थेचा नोंदणी कालावधी २००६ मध्ये संपल्यामुळे ते यानंतर देणग्या घेण्यास पात्र नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतरही त्यांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे देणग्या घेणे सुरूच ठेवल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने केलेल्या तक्रारीवरून २०१९ मध्ये भोईवाडा पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा >>> सायबेरिया ते भांडुप… दहा हजार किलोमीटरचे अंतर ‘बाला’ ने पार केले फक्त दहा दिवसात

तक्रारीनुसार, याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने नवी दिल्लीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक संशोधन विभागाला पत्र लिहिले होते. त्याच्या उत्तरात अरविंदो इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड सायंटिफिक रिसर्च ट्रस्ट अस्तित्वात नाही आणि ट्रस्ट देणगी मिळविण्यासाठी दाखवत असलेले प्रमाणपत्र बनावट असून असे कोणतेही प्रमाणपत्र या संस्थेला देण्यात आले नसल्याचे वैज्ञानिक संशोधन विभागाने म्हटले होते. संस्था बनावट असल्याचे आढळल्यानंतर प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. आरोपींनी २०१३ ते २०१९ दरम्यान विविध संस्थांकडून देणगी स्वरूपात सात बँक खात्यांमध्ये १९४ कोटी ६७ लाख रुपये स्वीकारल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. या देणग्यांच्या माध्यमातून करात सवलत घेऊन केंद्र सरकारची ५८ कोटी ५९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा >>> महावितरणाच्या विद्युत सहाय्यक पदाच्या पात्र उमेदवारांचे आंदोलन; आठ दिवसांपासून उपोषण सुरू

ट्रस्टच्या खात्यात जमा झालेली देणगीची रक्कम पुढे गुजरातमधील विविध कंपन्यांच्या सहा बँक खात्यांमध्ये वळती केली गेली. परंतु जेव्हा अधिकाऱ्यांनी या रकमेचा माग घेतला असता तेथे कंपनीचे कोणतेही कार्यालय सापडले नाही. यापूर्वी याप्रकरणी उमेश नागडा व चिमणलाल दर्जी या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. मुख्य आरोपी दीपक शहा सहआरोपी नागडा याच्याकडून स्वाक्षरी केलेले धनादेश स्वीकारायचा. त्या बदल्यात नागडाला दर महिना २० हजार रुपये मिळत होते. त्यामुळे याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार शहा असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यामुळे शहाला अहमदाबाद येथून आर्थिक गुन्हे शाखेने गुरूवारी अटक केली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. शहा २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे.