नवी मुंबईला शिवाजी महाराजांचे, पुण्याला संभाजी महाराजांचे नाव द्या: अबू आझमी

नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांच्या नामकरणाची मागणी

अबू आझमींची मागणी

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज (२८ नोव्हेंबर २०१८, बुधवार) विधानसभेमध्ये नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांच्या नामकरणाची मागणी केली. विधानसभेत बोलण्यासाठी आझमी उभे राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मागणीची सुरुवात करण्याआधीच ‘शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा दिली. पुढे बोलताना त्यांनी नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे केली.

केवळ इतक्यावरच न थांबता आझमी यांनी ठाणे आणि पुण्याचे नाव बदलून शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई आणि पुत्र संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. या मागणीबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे नाव ठाणे शहराला देऊन ठाणे शहराचे नाव बदलून ते ‘जिजामाता नगर’ असे करण्यात यावे. तसेच, शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवणारे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुणे शहराचे नामकरण करुन पुण्याला छत्रपती संभाजी नगर नाव द्यावे अशी मागणी केली. आपल्या या मागण्यांना संपूर्ण विधानभवन समर्थन देईल अशी आशा असल्याचेही सांगत त्यांनी आपली मागणी विधानभवनात मांडली.

दोन आठवड्यापूर्वीच संभाजी ब्रिगेडने पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी केली होती. पुणे हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी वसवले असल्यामुळे त्यांचेच नाव या शहराला द्यावे असे ब्रिगेडच्या नेत्यांचे म्हणणे आहे. याशिवाय सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करावे असेही संघटनेने आपल्या मागणीत म्हटले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Abu azmi demands renaming navi mumbai by name of shivaji maharaj

ताज्या बातम्या