scorecardresearch

“नामांतरच करायचं असेल, तर महाराष्ट्राचं नाव…”; अबू आझमी यांचं मोठं विधान

छोट्या-छोट्या जिल्ह्यांची नावं बदलण्यात काहीही अर्थ नाही. नाव बदल्याचं असेल तर महाराष्ट्राचे नाव बदलावे, अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी दिली आहे.

“नामांतरच करायचं असेल, तर महाराष्ट्राचं नाव…”; अबू आझमी यांचं मोठं विधान
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

छत्रपती संभाजी महाराज करा, आम्ही टाळ्यावाजवून त्याचं स्वागत करू, अशी प्रतिक्रिया समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी दिली आहे. ते मुंबईत टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी बोलताना, निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्यासाठी सरकारमधील लोकं मुस्लीम नावं बदलवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – “एकनाथ शिंदे अन् त्यांच्या सवंगड्यांना गाडणारा…”, शिंदे गटाच्या आमदाराची संजय राऊतांवर टीका; उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य!

नेमकं काय म्हणाले अबू आझमी?

“मी कायद्याच्या चौकटी राहून काहीही बोलू शकतो. संविधानाने मला ते अधिकार दिले आहेत. राज्यात सध्या औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर हे तीनच जिल्हे आहेत. ज्यांची नावं मुस्लीमांच्या नावावर आहेत. ही नावं बदलवू नये. त्याने कोणताही विकास होणार नाही. उलट खर्चच वाढेल”, अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी दिली.

“लोकांनी आता शुद्धीवर यावं”

“काही सांप्रदायिक लोक टीव्हीवर येऊन हिंदू-मुस्लीमांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतात. या लोकांनी आता शुद्धीवर यावं. हा देश हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई अशा सर्वांचाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जितका आदर इतर समाजातील लोक करतात, त्याहून अधिक आदर मुस्लीम समाज करतो. मुस्लीमांसाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. त्यांच्या सैन्यात ४० टक्के मुस्लीम सैनिक होते. वकील, सुरक्षा रक्षक सर्व मुस्लीम होते. मुळात ही लढाई धर्माची नव्हती, तर सत्तेची होती. राजा, महाराजांना धर्माशी काहीही देणेघेणे नव्हतं. त्यामुळे या गोष्टींवर राजकारण करणे चुकीचं आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले”, हिंदू राष्ट्रसेना प्रमुख धनंजय देसाईंची अजित पवारांवर टीका

“हिंदूंची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे”

“राज्य सरकारमधील लोकं हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करत आहे. शिवसेना-भाजपा हे काम आधीपासूनच करत होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्याच मार्गावर आहेत. हे सरकार विकासाचं राजकारण नाही, तर हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करून मुस्लिमांचा चुकीचा इतिहास समोर आणून हिंदूंची दिशाभूल करण्याचं काम करत”, असा आरोपही त्यांनी केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 17:32 IST

संबंधित बातम्या