सध्या राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी निघत असलेल्या मराठा मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी मुस्लिम समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. देशातील अन्य समाजांप्रमाणे मुस्लिमांनाही न्याय मिळाला पाहिजे. मुस्लिमांनीही आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढावेत आणि मराठ्यांप्रमाणे आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आझमी यांनी म्हटले आहे. दरम्यान, मराठा मोर्च्यांप्रमाणे मुस्लिम समाजाचे मोर्चे काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मोर्च्याच्या नियोजनसाठी आज मुंबईत एक बैठक पार पडणार आहे. अबू आझमींसह मुस्लिम समाजातील नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आघाडी सरकारच्या काळात मुस्लिम समाजाला  शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला होता. परंतु, सत्ताबदल झाल्यानंतर युती शासनाने हा अध्यादेश रद्द केला होता. मात्र, आता मराठा समाजाकडून काढण्यात येत असलेल्या मोर्च्यांमुळे मुस्लिम समाजच्या आरक्षणाची मागणी पुन्हा जोर पकडण्याची शक्यता आहे.
मुस्लिमांनी संघटितपणे संघर्षांची गरज
दरम्यान, अबू आझमींच्या मोर्चे काढण्याच्या आवाहनामुळे वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अबु आझमी यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले होते. पाकिस्तानी कलाकारांना नाहक धमकावण्यापेक्षा हिंमत असेल तर आत्मघातकी पथके बनवून लाहोर आणि कराचीला पाठवावे, असे आझमी यांनी म्हटले होते. कलाकारांना धमकी देणे हा मनसेची राजकीय खेळी असल्याचे सांगत ते म्हणाले, पाकिस्तानला विसरा, तुम्ही (राज ठाकरे) खूप छोटे नेते आहात. तुमची धाव फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे. आज नक्षलवाद्यांकडून गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पोलीस व सुरक्षा दलांवर हल्ले करत आहेत. जर तुम्ही कराची आणि लाहोरमध्ये काही करू शकला नाहीत तर आपल्या कार्यकर्त्यांना किमान चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पाठवून आपल्या सुरक्षा दलाची मदत तरी केली पाहिजे. असं काही करू शकलात तरच मी तुमच्यात काही दम आहे असे समजेन, असा टोलाही आझमी यांनी राज ठाकरे यांना लगावला होता.