मुंबई : भावाच्या निधनानंतरचे विधी पार पाडण्यासाठी तातडीचा पॅरोल देण्याची कुख्यात गुंड अबू सालेम याची मागणी उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. उत्तर प्रदेश येथील आजमगढस्थित मूळ गावी जाण्यासाठी उपलब्ध केल्या जाणाऱ्या पोलीस संरक्षणाचा खर्च उचलण्यास असमर्थ असल्याचे सालेमतर्फे स्पष्ट करण्यात आल्यावर न्यायालयाने त्याची परोलसाठीची याचिका फेटाळली.
पोलीस संरक्षणाचा खर्च उचलावा लागेल अन्यथा आम्ही याचिका फेटाळून लावू, असा इशारा न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने त्याला मागील सुनावणीच्या वेळी दिला होता व भूमिका स्पष्ट करण्यासाठी अखेरची संधी दिली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी, पोलीस संरक्षणाचा खर्च उचलण्यास असमर्थ असल्याचे सालेमच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
तसेच, आपण आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नाही. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटात देखील आपल्यावर केवळ शस्त्र अभिनेता संजय दत्त याच्या घरी पोहोचवण्याची जबक्बादारी होती. त्यात आपल्याला दोषी ठरवण्यात आले आहे, असेही सालेमच्या वतीने वकील फरहाना शाह यांनी न्यायालयाला सांगितले. याशिवाय, यापूर्वीही सालेम याला दोन वेळा पॅरोल मंजूर करण्यात आला होता आणि त्यावेळी पोलीस संरक्षणाचा खर्च आकारण्यात आला नव्हता, असे शाह यांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाने त्यांच्यासह राज्य सरकार आणि सीबीआयचे म्हणणे ऐकल्यावर सालेमची याचिका फेटाळत असल्याचे स्पष्ट केले. त्याला पॅरोल मंजूर केल्यास कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे म्हटले आहे. ही बाब दुर्लक्षित करता येणार नसल्याचे न्यायालयाने सालेमला दिलासा नाकारताना स्पष्ट केले.
दरम्यान, मोठा भाऊ अबू हकीम अन्सारीचे नोव्हेंबर २०२५ मध्ये निधन झाल्यामुळे कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि भावाच्या निधनानंतरच्या चाळीसाव्या विधीला उपस्थित राहण्यासाठी १४ दिवसांचा पॅरोल देण्याची मागणी सालेमने केली होती. त्याने १५ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात तुरुंग प्रशासनाकडे अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

