scorecardresearch

Premium

आता भाजपवर आरोपास्त्र!; फडणवीसांचे निकटवर्तीय, सोमय्या, कंबोज लक्ष्य; कोटय़वधींचा गैरव्यवहार केल्याचा राऊत यांचा दावा 

भाजपमधील साडेतीन नेत्यांची प्रकरणे बाहेर काढणार असल्याचे सूतोवाच करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती.

छाया : गणेश शिर्सेकर
छाया : गणेश शिर्सेकर

फडणवीसांचे निकटवर्तीय, सोमय्या, कंबोज लक्ष्य; कोटय़वधींचा गैरव्यवहार केल्याचा राऊत यांचा दावा 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपने शिवसेना नेत्यांवर गैरव्यवहार व भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उडवली असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपवर आरोपास्त्र डागल़े  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत राऊत यांनी भाजपला आक्रमक प्रत्युत्तर दिल़े  

Sharad Pawar pimpri chinchwad
पक्षातील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच अजितदादांच्या बालेकिल्यात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
maharashtra agriculture minister dhananjay munde praise union minister nitin gadkari in event at akola
अकोला: नितीन गडकरींमुळेच मी कृषीमंत्री; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
farmer suicides in Vidarbha
विदर्भातील शेतकरी आत्‍महत्‍यांचे सत्र केव्‍हा थांबणार?
CM Eknath Shinde criticised uddhav tackeray
पोटदुखीवाल्यांसाठी आता ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रम; पाचोऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

भाजपमधील साडेतीन नेत्यांची प्रकरणे बाहेर काढणार असल्याचे सूतोवाच करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शिवसेना भवनवर राऊत यांच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शिवसेना भवनबाहेर हजारो शिवसैनिक जमा झाले होते. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, किरीट सोमय्या व त्यांचे पूत्र आणि मोहित कंबोज या भाजपच्या नेत्यांना राऊत यांनी लक्ष्य केले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यापैकी ५ हजार कोटी रुपयांच्या व्यवहारांचे तपशील सापडले आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला. अमोल काळे आणि विजय ढवंगाळे कोण आहेत व त्यांना कुठे लपवले आहे, असा सवाल करत या प्रकरणाचे पुरावे आधी आर्थिक गुन्हे शाखेला व नंतर ईडीला देणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले. हरियाणात एस. नर्वर हा दूधवाला असून राज्यातील भाजप सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षांत तो ७ हजार कोटी रुपयांचा मालक झाला. त्यापैकी ३५०० कोटी रुपये महाराष्ट्रातून गेले आहेत. या व्यक्तीचे फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरी येणे-जाणे होते, असा आरोप राऊत यांनी केला. मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांचे लाडके असून एक दिवस ते फडणवीसांनाच बुडवतील, असा इशाराही राऊत यांनी दिला.

कंबोज यांनी पीएमसी बँक घोटाळय़ातील राकेश वाधवान याच्याकडून पत्राचाळ भागातील १२ हजार कोटी रुपयांची जमीन अवघ्या १०० कोटी रुपयांना घेतली, असा आरोपही राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर राऊत यांनी थेट आरोप केला नसला तरी त्यांच्या निकटवर्तीयांच्या गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर काढीत राऊत यांनी फडणवीस यांच्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले. राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा अत्यंत शेलक्या शब्दांत उल्लेख केला. नील किरीट सोमय्या यांची ‘निकॉन इन्फ्रा कन्सट्रक्शन’ ही कंपनी असून वसईतील गोखिवरे येथे मोठा प्रकल्प राबवत असून त्यांचाही पीएमसी बँक घोटाळय़ातील राकेश वाधवानशी संबंध आहे. देवेंद्र लाडानीच्या नावे सोमय्यांनी ४०० कोटी रुपयांची जमीन ४.५ कोटी रुपयांना घेतली. तसेच वाधवान याच्याकडून १०० कोटी रुपये वसूल केले. सोमय्यांच्या प्रकल्पांना पर्यावरण विभागाची परवानगी नाही, असा आरोप करत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची दखल घ्यावी, अशी मागणी राऊत यांनी केली.

माजी वनमंत्र्याच्या मुलीच्या विवाह सोहळय़ात वन परिसराचा देखावा तयार करून साडेनऊ कोटींचा गालिचा अंथरला होता, असा आरोपही राऊत यांनी कोणाचे नाव न घेता केला.

मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती नको अशी भूमिका घेत मराठीच्या विरोधात सोमय्या न्यायालयात गेले होते. अशा मराठीद्वेष्टय़ा सोमय्यांच्या माध्यमातून भाजप सतत महाराष्ट्रातील नेते, व्यावसायिकांविरोधात मोहीम राबवत आहे. मराठी लोकांना उद्योग-व्यवसाय करूच नये यासाठी आरोप, बदनामीचे तंत्र वापरले जात असून भाजपचे हे मराठी द्वेषाचे राजकारण चालणार नाही. सामना शिवसेनेशी आहे हे लक्षात ठेवा, असे आव्हानही राऊत यांनी दिले.  मी तुरुंगात गेलो तर तुम्हालाही घेऊन जाईन, असा इशारा राऊत यांनी भाजपला दिला़  तुरुंगात गेलोच तर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहू शकत नाही, असेही राऊत म्हणाल़े

ठाकरे व पाटणकरांवरील आरोप खोटे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिबागजवळ १९ बंगले बांधल्याचा आरोप भाजप नेते करतात. पण ते बंगले दाखवावेत, असे आव्हान राऊत यांनी दिले. त्याचबरोबर श्रीधर पाटणकर यांनी देवस्थानच्या जमिनी घेतल्याचा आरोपही खोटा असून १२ व्या खरेदीदाराकडून त्यांनी जमीन घेतली. त्यामुळे देवस्थानची जमीन मिळवल्याचा आरोप खोटा आहे, असे संजय राऊत म्हणाले. ठाकरे यांचे १९ बंगले सोमय्या यांनी दाखविल्यास मी राजकारण सोडीन, असे आव्हानही राऊत यांनी दिले.

‘ईडी’च्या अधिकाऱ्यांवर  ३०० कोटींच्या वसुलीचा आरोप

भाजप नेत्यांबरोबरच संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. ईडीचे अधिकारी माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाले, मेहंदीवाले यासारख्यांना त्रास देत आहेत. पण तेच अधिकारी मोठय़ा भ्रष्टाचारात सामील आहेत. मुंबईच्या ७० बिल्डरांकडून ईडीच्या अधिकाऱ्यांनी ३०० कोटी रुपयांची वसुली केली होती. या अधिकाऱ्यांची संपत्ती, ते करीत असलेली मौजमजा व इतर सर्व माहिती आमच्याकडे असून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना देणार असल्याचे राऊत म्हणाले. येत्या काही दिवसांत भाजप नेते व ईडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रकरणांच्या काही चित्रफिती व इतर पुरावे जाहीर करणार असल्याचा इशाराही राऊत यांनी दिला.

मराठीद्वेष..

शाळांमधील मराठी सक्तीच्या विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती़ यावरून सोमय्या यांचा मराठीद्वेष स्पष्ट होतो, असे नमूद करीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी भाजपवर मराठीद्वेषाचा आरोप केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्रात ठिणगी पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

माझी चौकशी करावी : सोमय्या

‘‘शिवसेनेच्या मुखपत्रातून २०१७ मध्ये माझ्या पत्नीच्या नावाने असेच आरोप करण्यात आले होते. त्याच बांधकाम व्यावसायिकाचे नाव घेऊन आज माझ्या मुलावर आरोप करण्यात आले. त्याबाबत ठाकरे सरकारने माझी जरुर चौकशी करावी’’, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. संजय राऊत यांच्या आरोपबाबत सोमय्या हे बुधवारी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आह़े 

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abuse corruption former chief minister devendra fadnavis kirit somaiya mohit kamboj bjp shiv sena mp sanjay raut

First published on: 16-02-2022 at 01:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×