मुंबई-पुणे मार्गासाठी चाचणीला गती, शिवनेरीला वातानुकूलीत पर्याय
एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच चालवण्यात येणाऱ्या वातानुकूलित डबलडेकर गाडीची चाचणी गतीने सुरू झाली आहे. मुंबई-पुणे मार्गादरम्यान घाटातील वळणे आणि बोगद्यासारख्या अडथळ्यांतून मार्ग काढण्यासाठी बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर गाडी चालवून चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र बेस्टची बस वातानुकूलित नसल्याने व वजनाला हलकी असल्याने तिच्या चाचणीबाबतही एसटी अधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत.
परदेशात लोकप्रिय असलेल्या डबलडेकर गाडय़ा प्रवासी वाहतुकीसाठी मुंबई-पुणे मार्गावर चालवण्याचा विचार एसटी महामंडळाकडून केला जात आहे. एका वातानुकूलित डबलडेकर गाडीमुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक होण्यासह इंधनाची बचत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या एसटी महामंडळाकडून मुंबई-पुणे मार्गावर वातानुकूलित शिवनेरी बस गाडय़ा चालवल्या जातात. या गाडय़ांना प्रवाशांकडून वर्षभर चांगला प्रतिसाद असतो. याच धर्तीवर डबलडेकर गाडी चालवल्यास एसटीच्या उत्पन्नात भर पडेल, या अनुषंगाने परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी या संदर्भातील व्यवहार्यता तपासण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. देशात केवळ दोन शहरात प्रवासी वाहतुकीसाठी डबलडेकर बस गाडीचा वापर केला जातो. त्याआधारे अशा डबलडेकर गाडय़ांची माहिती मिळवली जात आहे.
दरम्यान बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर गाडी भाडे तत्त्वावर घेऊन मुंबई-पुणे मार्गावर या गाडीची चाचणी केली जाणार आहे. यासाठी परिवहन विभागाची परवानगी घेतली जाणार आहे.
त्यानंतर डबलडेकर गाडी या मार्गावर चालवण्यास अडचण नसल्यास ‘स्वारस्य अभिरुची सूचना’ मागवण्यात येतील. तसेच डबलडेकर गाडीसाठी आवश्यक यंत्राची खरेदी परदेशातून केली जाऊ शकते, असे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई-पुणे मार्गावर डबलडेकर चालवावी असे आमचे प्रयत्न आहेत. यात बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील डबलडेकर गाडीचा पर्याय पुढे येत आहे. मात्र बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर ही वातानुकूलित नसल्याने आणि तिचे वजन कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही पर्याय आहेत का, याचा सखोल अभ्यास एसटी महामंडळाकडून केला जात आहे.
-दिवाकर रावते, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष