मध्य रेल्वेवर १६ एप्रिलपासून चाचणी; तीन-चार महिन्यांत सेवेत
मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित वातानुकूलित लोकल मंगळवारी मध्य रेल्वेवर दाखल होणार आहे. चेन्नईच्या इंटीग्रेटेड कोचिंग फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) तयार झालेली ही गाडी गेल्या आठवडय़ात चेन्नईहून मुंबईकडे रवाना करण्यात आली होती. मंगळवारी ही गाडी पोहोचल्यानंतर काही कामे करून १६ एप्रिलपासून मध्य रेल्वेवर या गाडीची चाचणी सुरू होणार आहे. प्रवासी सुरक्षेबाबतच्या सर्व चाचण्या झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून गाडीला परवानगी मिळण्यास पुढील तीन-चार महिन्यांचा कालावधी जाणार असून त्यानंतरच ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येईल.
भारतीय रेल्वेची सुरुवातच १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य रेल्वेपासूनच झाली होती. ही ऐतिहासिक घटना ध्यानात ठेवूनच आम्ही १६ एप्रिल याच दिवशी या गाडीची चाचणी सुरू करणार आहोत, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले. ही गाडी मंगळवारी मध्य रेल्वेवर दाखल होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मध्य रेल्वेच्या ताब्यात ही गाडी आल्यानंतर ती कारशेडमध्ये दाखल होईल. या गाडीची विद्युत यंत्रणा कार्यान्वित करणे, काही अंतर्गत कामे करणे आदी गोष्टी हाती घेतल्या जातील. ही कामे १४ एप्रिलपर्यंत पूर्ण करून १६ एप्रिलला ही गाडी पहिल्यांदा मध्य रेल्वेवर धावेल; पण या फेरीत प्रवाशांना प्रवासाची परवानगी नसेल, असेही ब्रिगेडिअर सूद यांनी सांगितले. गाडीचा वेग, ब्रेक, आसनव्यवस्था, वातानुकूलन आदींची चाचणी केली जाईल. रेल्वे सुरक्षा आयुक्तही गाडीची चाचणी करतील. त्यानंतर ही गाडी प्रवाशांच्या सेवेत रूजू होईल.