मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील ‘एक विद्यार्थी – एक शैक्षणिक खाते’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व विद्यार्थ्यांचे श्रेयांक बँक खाते (एबीसी) उघडण्याच्या सूचना सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना दिल्या आहेत. त्यानुसार २०२५ मधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी ३० जूनपर्यंत एबीसी प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. ही अंतिम मुदत असून त्यानंतर परीक्षा वर्ष २०२५ साठी नवीन नोंदी अपलोड करण्याची सुविधा बंद करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्थेत लवचिक, बहुविषयक आणि क्रेडिट-आधारित शिक्षण प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये सहजपणे प्रवेश, निर्गमन, क्रेडिट हस्तांतरण आणि आयुष्यभर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ॲकेडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ही महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविण्यात येत आहे. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी अपार आयडीशी जोडून वेळेवर अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे.

यामुळे एबीसीची प्रभावी अंमलबजावणी होऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्रेडिट्सचे संकलन, हस्तांतरण, वापर आणि इतर सेवा सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या निर्देशांनुसार २०२५ मधील मार्कशीट, ग्रेडशीट तसेच संबंधित क्रेडिट डेटा एबीसी रिपॉझिटरीमध्ये अपलोड करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि इतर उच्च शिक्षण संस्थांना परीक्षा वर्ष २०२५ संदर्भातील सर्व शैक्षणिक नोंदी ३० जून २०२६ पर्यंत अपलोड करण्याचे निर्देश शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत. ही अंतिम मुदत असून त्यानंतर परीक्षा वर्ष २०२५ साठी नवीन नोंदी अपलोड करण्याची सुविधा बंद करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी अपलोड केलेल्या नोंदींमध्ये काही त्रुटी असल्यास एबीसी प्रणालीच्या निर्धारित प्रक्रियेनुसार आवश्यक दुरुस्त्या किंवा बदल करण्यास परवानगी दिली जाऊ शकते, असेही शिक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण मंत्रालयाने सर्व उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या सध्याच्या प्रगतीचा आढावा घेऊन निर्धारित मुदतीत सर्व शैक्षणिक नोंदी आणि क्रेडिट डेटा अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयाच्या मते, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान बनविण्यासाठी एबीसी प्रणालीचा यशस्वी वापर अत्यंत महत्त्वाचा आहे.