माजी महसूल राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या मालकीच्या मुंबईतील कफपरेड येथील बंगल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला.
एका देवस्थानच्या जमीन विक्री प्रकरणात लाच घेण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणासंबंधिच्या चौकशी अंतर्गत लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील परंदवडी येथील देवस्थानच्या जमिनीप्रकरणी तत्कालीन महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडे सुनावणी झाली होती. या प्रकरणाचा निकाल जमीन खरेदी-विक्री करणाऱया व्यावसायिकाच्या बाजूने देण्यात आला होता. परंतु, याचा आदेश देण्यासाठी महसूल विभागाचे कक्ष अधिकारी आणि एजंट म्हणून काम करणारा वैभव आंधळे आणि देवीदास दहीफळे यांनी या व्यवसायिकाकडे २५ लाखांची लाच मागितली होती. त्यातील २३ लाख घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांनाही रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे या प्रकरणात सुरेश धस यांच्यावरही संशयाचे सावट निर्माण झाले आणि पुढील चौकशी अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कायदेशीररित्या न्यायालयाकडून सर्च वॉरंट मिळवून धस यांच्या घरावर छापा टाकला.
या छाप्यामध्ये धस यांच्या घरातून देवस्थान जमिनीच्या आदेशाच्या मूळ प्रती आणि सहकार खात्याशी संबंधित चार महत्त्वाच्या फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत.