मुंबई : शिवसेनेतील बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी शिवसेनेच्या हालाचालींना वेग आला असून विधिमंडळात शुक्रवारी त्याबाबत प्रदीर्घ बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत संबंधित आमदारांना ४८ तासांत हजर होण्याची नोटीस बजावण्याबाबत चर्चा झाली.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यासह काही प्रमुख सेना नेत्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची शुक्रवारी दुपारी भेट घेतली. गुरुवारी १२ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची याचिका शिवसेनेने दाखल केली होती. त्यात आणखी चार आमदारांविरोधात याचिका करण्यात आली. तसेच या सर्व १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी कायद्यातील तरतुदींची माहिती व सल्ला घेण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना विधिमंडळात बोलवण्यात आले. जवळपास पाच तास त्यांच्यासह बैठक चालली. ते गेल्यानंतरही ही बैठक सुरूच होती. संबंधित आमदारांना ४८ तासांत हजर होण्याची नोटीस पाठवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.