आरे – दहिसर – डहाणूकरवाडी मेट्रो मार्गिकेतील भाडेतत्त्वावरील सायकल सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला ७६६ जण सायकलने प्रवास करीत असून दिवसभरात सायकलच्या १२४० फेऱ्या होत आहेत.मेट्रोची प्रवासीसंख्या वाढावी आणि प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या यासाठी एमएमआरडीएने मेट्रो स्थानकांबाहेर विविध सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘मल्टी मॉडल इंटीग्रेशन’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत मेट्रो स्थानकांबाहेर पादचारीपूल, सायकल सेवा, खासगी वाहनांसाठी थांबा आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यानुसार आता आरे – दहिसर – डहाणूकरवाडी मार्गिकेतील १८ मेट्रो स्थानकांबाहेर जूनमध्ये सायकल सेवा सुरू करण्यात आली आहे. ‘माय बाईक’ कंपनीच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी एमएमआरडीएने ‘माय बाईक’ कंपनीबरोबर सामंजस्य करार केला असून या कंपनीने सध्या १८ स्थानकांबाहेर एकूण १५० सायकल उपलब्ध केल्या आहेत.

हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी

प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या सेवेअंतर्गत प्रवाशांना १५ तासांसाठी ३० रुपये शुल्क मोजावे लागतात. १५ तासांपुढे प्रत्येक तासासाठी दोन रुपये शुल्क आकारण्यात येते. तसेच ८०० रुपये भाडे आकारून महिन्याभर सायकल भाड्याने देण्यात येते. या सेवेमुळ मेट्रोतून बाहेर पडल्यावर सायकलने थेट घर, कार्यालय वा इच्छित स्थळ गाठता येत आहे. ‘मायबाईक’ अँपद्वारे प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा >>> पुणे : नदीपात्रातील खुनाचा उलगडा ,मामे भावाकडून तरुणाचा खून ; तिघे गजाआड

एमएमआरडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवसाला ७६६ जण सायकलचा वापर करीत आहेत. नागरिकांनी आठवडाभर अथवा संपूर्ण महिन्यासाठी जवळपास १६७ सायकली भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. आतापर्यंत आठवडा ते महिन्याभरासाठी भाड्याने घेण्यात आलेल्या सायकल तब्बल ४९ हजार ७५ तासांसाठी वापरण्यात आल्या आहेत. तसेच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा ६ हजार २०० तास एकेरी वापर झाला आहे. आजघडीला दिवसाला सायकलच्या १२४० फेऱ्या होत आहेत. पर्यावरण पूरक अशा या सेवेला येत्या काळात आणखी प्रतिसाद मिळेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.