मुंबई : ‘‘मी छोटी नव्हे, मोठी आव्हाने स्वीकारून स्वत:ला सिद्ध करून दाखवतो. सहा महिन्यांपूर्वीच मी मोठे आव्हान स्वीकारले आणि जनतेच्या मनातले सरकार स्थापन केले’’, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना दिले.
सागरी किनारा मार्गातर्गत वरळी येथे पुलाच्या खांबांमधील अंतर वाढवून देण्याची मागणी शिंदे- फडणवीस सरकारने मान्य केल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी वरळी कोळीवाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला फडणवीस हे अनुपस्थित होते.
‘‘निवडणूक आली म्हणून आम्ही घोषणा करत नाही, तर लोकांची कामे करण्यासाठी सत्तेवर आलो आहोत. त्याप्रमाणे कामे सुरू आहेत’’, असे त्यांनी नमूद केले. सत्तेची हवा डोक्यात गेलेल्यांना लोकांच्या प्रश्नांची जाणीव नसते, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना लगावला. वरळी कोळीवाडय़ातील गोल्फादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
शिवसेनेत फूट पडल्याने आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी विभागाचे पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीयदृष्टय़ा महत्त्व वाढले आहे. या विभागातील दोन माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यात शिंदे गटाला यश आले आहे. ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचे प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाकडून सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. ‘‘मी राजीनामा देतो, एकनाथ शिंदेंनी वरळीतून लढून दाखवावे’’ असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपने यावेळी आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या नागरी सत्कार सोहळय़ातून केला.
दादर स्थानकापासून ते आदर्श नगर येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानापर्यंत ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात फलकबाजी करण्यात आली होती. जागोजागी भगवे झेंडे, भाजपचे झेंडे लावण्यात आले होते. मुंबईतील विविध भागांतील कोळी बांधव पारंपरिक वेशात खास कोळी वाद्यवृंदाच्या तालावर नृत्य करत कार्यक्रमस्थळी दाखल होत होते. ‘वरळी कोळीवाडा क्लिव्हलँड बंदर, १२० मी. नेव्हीगेशन स्पॅन’ याची प्रतिकृती कार्यक्रमस्थळी ठेवली होती.
यावेळी व्यासपीठावर भाजपचे नेते आशीष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, नितेश राणे, प्रसाद लाड, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे नेते, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, प्रवक्ते किरण पावसकर, आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर, संजय शिरसाट, माजी आमदार अशोक पाटील, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, यशवंत जाधव आदी उपस्थित होते.
‘कोळीवाडय़ांच्या विकासाचा आराखडा तयार’
कोळीवाडय़ांच्या विकासाचा आराखडा तयार आहे. संपूर्ण मुंबईत त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले. कोळीवाडय़ांच्या सीमांकनाची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.