मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचा १ कोटी ५ लाख रुपयांचा अपघात विमा मंजूर झाला आहे. त्यांच्या मृत्युच्या पहिला आठवड्यात कंपनीने अपघात विम्याचा दावा मंजूर केला आहे.
विदीप जाधव यांनी ‘न्यू इंडिया इन्शुरन्स’ या कंपनीचा अपघात विमा घेतला होता. ते २००९ च्या तुकडीचे मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. २०१४ ते २०१९ या काळात ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात कार्यरत होते. २०१९ पासून ते अजित पवार यांच्या सुरक्षा पथकात सामील झाले. विदीप जाधव हे ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे कुटुंबासह राहत होते. त्यांचे पदवीचे शिक्षण मुंबईत झाले. देशसेवेची आवड असल्याने ते पोलीस सेवेत रूजू झाले हाेते.
त्यांचे मूळ गाव फलटण तालुक्यात तरडगाव आहे. त्यांना १३ वर्षांची नेत्रा ही मुलगी आणि ९ वर्षांचा अव्दित मुलगा आहे. त्यांच्या पत्नी पनवेलच्या आहेत. विदीप यांची पोलीस दलातील १६वर्षांची सेवा झाली आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहीत पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तरडगावी जावून विदीप यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आमदार रोहीत पवार यांनी घेतली आहे.
विदीप जाधव यांनी मुंबई ते बारामती या अजित पवार यांच्या विमानाला अपघात हाेण्यापूर्वी काढलेले छायाचित्र समाज माध्यमावर जोरदार व्हायरल झाले होते. या विमान अपघातामध्ये विदीप यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, दोन वैमानिक आणि क्रूअटेंडंट असे पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. मनमिळावू आणि मदतीला सदैव तत्पर असलेल्या विदीप जाधव यांना बाईकची आवड होती.
का गेले दौऱ्यावर :
विदीप जाधव यांना वडिलांच्या उपचारासाठी गावी जायचे होते. त्यांचे गाव बारामतीपासून २५ किमी अंतरावर फलटण तालुक्यात तरडवाडी आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजीच्या दौऱ्याची ड्युटी घेतली होती. बारामतीहून ते गावी जाणार होते. तसे त्यांनी अजित पवार यांना सांगितले होते. आई-वडीलांना येतो असे कळवले होते. पत्नी व मुलांस पनवेल येथे माहेरी गेली होती. पण विदीप जाधव यांचा हा प्रवास अखेरचा ठरला.

