मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक अद्यापही पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे महामार्गावर आज वारीतील वारकऱ्यांप्रमाणे वाहनांची नागमोडी रांग लागलेले चित्र पहायला मिळाले. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास खंडाळ्याजवळ तेलाचा टँकर उलटल्याने दोन्ही बाजूच्या मार्गावर तेल पसरले होते. त्यामुळे याठिकाणची वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली होती. यानंतर टँकरला रस्त्यावरून बाजुला करण्यात आले असून आत्तापर्यंत मुंबईच्या दिशेने येणारी एक आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही मार्गिकांवरची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही वाहतुकीचा वेग अत्यंत धीमा असून ती पूर्ववत होण्यास आणखी तासभराचा अवधी जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आज सकाळी झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक तब्बल दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. तेलाचा टँकर उलटल्याने महामार्गावर तेल पसरले. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता ही वाहतूक सध्या जुन्या मुंबई-पणे महामार्गावर वळविण्यात आली. मात्र, त्यामुळे वाहतुकीची आणखीनच कोंडी झालेली दिसून आली. खोपोली आणि लोणावळा परिसरात १७ ते १८ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रीघ लागली होती. आठवड्यातील सुट्टीचे दिवस असल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर वाहनांची अधिक गर्दी असते, त्यातच वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.