दोन वर्षांत २१८५ जणांचा रूळ ओलांडताना मृत्यू; मध्य रेल्वेवर ७० अनधिकृत मार्ग

मुंबई : रेल्वेगाडी वेळेवर पकडण्यासाठी किंवा स्थानकातून उतरल्यानंतर लवकर बाहेर पडण्याच्या घाईमुळे रूळ ओलांडून चोरवाटा गाठण्याचा प्रयत्न प्रवाशांच्या जिवावर बेतत आहे. घाईगडबडीत रूळ ओलांडताना रेल्वेगाडीची धडक बसून गेल्या दोन वर्षांत २१८५ प्रवाशांनी जीव गमावला. विविध रेल्वेस्थानकांच्या परिसरातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या चोरवाटा किंवा अनधिकृत मार्ग याला प्रामुख्याने जबाबदार असल्याचे दिसून येते. एकीकडे पश्चिम रेल्वेमार्गावर असे दोनच अनधिकृत मार्ग असताना, मध्य रेल्वेमार्गावर मात्र ७० चोरवाटा उघड झाल्या आहेत.

रूळ ओलांडण्यासाठी काही जण रेल्वे स्थानक हद्दीतील अनधिकृत प्रवेशद्वारांचा सर्रास वापर करतात, तर काही जण लोकल पकडण्यासाठी स्थानकातच एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांमध्ये हजारो नागरिकांना दर वर्षी जीव गमवावा लागतो. यात प्रवाशांचा हलगर्जीपणाच जास्त कारणीभूत ठरतो. काही वेळा दोन स्थानकांदरम्यान किंवा स्थानकाजवळच पादचारी पुलांच्या कमतरतेमुळे स्थानिक किंवा प्रवाशांना रूळ ओलांडण्याशिवाय पर्यायही राहात नाही.

मध्य रेल्वेवर सीएसएमटी लोहमार्ग पोलीस स्थानकअंतर्गत पाच, दादर लोहमार्ग पोलीस स्थानकांतर्गत चार, कुर्ला एक, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणेंतर्गत २५, डोंबिवली चार, कल्याण पाच, कर्जत ९, वडाळा तीन, वाशी लोहमार्ग पोलिसांतर्गत ११, पनवेलमध्ये तीन अनधिकृत मार्ग आहेत. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाणेंतर्गत दोन अनधिकृत मार्ग असल्याचे सांगण्यात आले. शीव स्थानकात मागच्या म्हणजेच कल्याण दिशेच्या बाजूकडून धारावी नाईक नगरकडे जाण्यासाठी खुला रस्ता होता. त्यामुळे बरेचसे प्रवासी, तिकीट नसलेले प्रवासी त्या दारातून रूळ ओलांडून बाहेर पडताना दिसतात; परंतु आता तो मार्ग लोखंडी दार लावून बंद करण्यात आला आहे. वांद्रे स्थानकातही अशाच पद्धतीने बांधकाम करून रूळ ओलांडून जाणाऱ्यांचे मार्ग बंद केलेले आहेत; परंतु वांद्रे टर्मिनस येथे सामानाची ने-आण करण्यासाठी रुळांवरून जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी केवळ मालवाहतूक करणारे कामगारच नाही, तर  प्रवासीदेखील रूळ ओलांडून जाताना दिसले.

कुर्ल्यात पादचारी पुलाला फाटा

कुर्ला स्थानकात चार पादचारी पूल असताना अनेक प्रवासी लवकर लोकल पकडण्याच्या प्रयत्नात रेल्वे रूळ पार करताना दिसतात. काही जण एका फलाटावरून उडय़ा मारून दुसऱ्या फलाटावर जातात. परिणामी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकलचा अंदाज चुकल्यास अपघाताला सामोरे जावे लागते. कुर्ला स्थानकापासून लोकमान्य टिळक टर्मिनसदेखील काही अंतरावर आहे. टर्मिनसकडे जाण्यासाठी एक फाटक असून ते बंद असतानादेखील टर्मिनसकडे जाणारे अनेक प्रवासी रेल्वे रूळ पार करतात.

अनधिकृत मार्गाचे ठाणे

ठाणे स्थानकात फलाट क्रमांक दोन तसेच तीन व चारवर उतरणारे अनेक प्रवासी कल्याण दिशेने उतरून रूळ ओलांडून स्थानकाबाहेर येण्याचा मार्ग पत्करतात. यात फलाट क्रमांक दोनवर कल्याणच्या दिशेने बाहेर पडण्यासाठी अनेक अनधिकृत मार्ग आहेत. त्यातच ठाणे ते कळवा दरम्यान रुळांजवळील झोपडय़ांतून, सिडको बस आगाराच्या मार्गाने ठाणे स्थानकात येण्यासाठी अनेक जण रुळांवरूनच चालण्याचाही पर्याय निवडतात. ठाणे पूर्वेलाही रेल्वेने केलेले संरक्षक कुंपण तोडलेले दिसते. त्यातून अनेक जण प्रवेश करून ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गावरील फलाटांकडे जातात.

चेंबूरमध्ये ‘शॉर्टकट’ जीवघेणा

चेंबूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात अनेक ठिकाणी संरक्षण कुंपण लावले आहे. त्यामुळे स्थानक परिसरात कोणीही रेल्वे रूळ पार करत नाहीत. मात्र स्थानकापासून काही अंतरावर सुभाष नगर आणि लोखंडे मार्गाच्या मधोमध एका ठिकाणी काही रहिवासी नेहमीच रूळ पार करतात. लोखंडे मार्गावरून आचार्य महाविद्यालयात जाताना उड्डाणपुलावरून हे अंतर अधिक असल्याने अनेक विद्यार्थी रूळ पार करण्याचा धोका पत्करतात. यासाठी ‘शॉर्टकट्स’चा मार्ग निवडतात.

मानखुर्दमध्ये ‘रुळ’लेली पायवाट

मानखुर्द स्थानकाजवळच असलेल्या महाराष्ट्र नगर येथून येण्यासाठी रहिवाशांना दुसरा पर्याय नसल्याने अनेक जण रेल्वे रुळातून स्थानकापर्यंत चालत येतात. महाराष्ट्र नगर येथून मानखुर्द टी जंक्शन परिसरात जाण्यासाठीदेखील एका पादचारी पुलाची आवश्यकता आहे. मात्र रहिवाशांच्या मागणीकडे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नेते आणि रेल्वे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी या ठिकाणी रहिवाशांना रेल्वे रूळ पार करण्याशिवाय पर्याय नाही.