मुंबई : ठाण्यातील बहुतांशी अपघाती मृत्यू हे खड्डे आणि रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे नाही, तर वाहन चालक बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवत असल्यामुळे झाल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीने नुकताच उच्च न्यायालयात करण्यात आला.

ठाण्यात खड्ड्यांमुळे अनेक मृत्यू झाल्याचा आरोप करणाऱ्या बातम्यांची न्यायालयाने दखल घेतली होती. तसेच, ठाणे महापालिकेला याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात, रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि दुखापतींच्या बाबतीत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार समिती स्थापन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी, १३ जुलै २०२५ च्या अपघाताचा संदर्भ देताना कासारवडवली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात, अपघात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाही, तर संबंधित वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे म्हटल्याकडे प्रतिज्ञापत्रात लक्ष वेधले आहे. तर १८ सप्टेंबर, २०२५च्या प्रतिज्ञापत्राद्वारे या घटनेचा तपशील न्यायालयासमोर आधीच ठेवल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे, १३ जुलै २०२५ रोजी २१ वर्षांच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात रात्री १० वाजण्याच्या सुमारास नागला बंदर येथे झाला. एका अज्ञात वाहनाने तरुणाच्या दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

याशिवाय, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी ट्रकने मागून दुचाकीला धडक दिल्यामुळे मनोज ठाकूर हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. परंतु, त्यांच्या मागे बसलेल्या स्वाती कदम यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. तर, २०१९ मध्ये नोंदवलेल्या पाच मृत्यूंचा आणि घोडबंदर मार्गावरील अपघातांचा समावेश असलेल्या अनेक प्रकरणांबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती, असा दावाही महापालिकेने प्रतिज्ञापत्रात केला आहे.

खड्ड्यांमुळे अपघाताची नोंदच नाही

उच्च न्यायालयाच्या १३ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशानुसार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी नुकसानभरपाई समिती स्थापन केली गेली. त्यात महापालिका आयुक्त आणि जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, ठाणे सचिवांचा समावेश आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीत या अपघातांवर चर्चा करण्यात आली आणि भरपाईची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलीस आणि विभागीय अहवाल मागवण्यात आल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.