काळाचौकीत ४०० विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय

शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने मोठय़ा संख्येने मुंबईत येणाऱ्या तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्यांच्या निवाऱ्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे.

२२ मजली वसतिगृह उभारण्याचा म्हाडाचा निर्णय

मुंबई : शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने मोठय़ा संख्येने मुंबईत येणाऱ्या तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्यांच्या निवाऱ्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे. काळाचौकी येथील जिजामातानगरमध्ये ४०० जण राहू शकतील, असे वसतिगृह बांधण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सध्या तयार करण्यात येत असून जिजामातानगर येथे वसतिगृहाची २२ मजली इमारत बांधण्यात येणार आहे, तर या वसतिगृहात खानावळीसह (मेस) विविध आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

नागरिकांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे देणाऱ्या म्हाडाने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी इतर प्रकल्पही राबविले आहेत. म्हाडाकडून नुकतीच कर्करोगग्रस्तांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी १०० घरे देण्यात आली आहेत, तर आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत चार वसतिगृह बांधण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता पहिले वसतिगृह काळाचौकी येथील जिजामातानगरमध्ये बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई मंडळाचे सहमुख्य अधिकारी जीवन गलांडे यांनी दिली.

जिजामातानगर झोपडपट्टीलगत म्हाडाचा १५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा मोकळा भूखंड आहे. याच भूखंडावर वसतिगृहाची २२ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. ही इमारत नेमकी कशी असेल आणि यासाठी किती खर्च येईल यासाठीचा सविस्तर आराखडा तयार केला जात असल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सविस्तर आराखडय़ाचे काम

सध्या या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येत असून यासाठीचा प्रस्ताव येत्या काही महिन्यांत मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर बांधकामासाठी निविदा मागण्यात येतील. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कं त्राटदाराला इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. यासाठी आणखी सात-आठ महिने लागतील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

वसतिगृहाची रचना

  • २२ मजली इमारतीतील तळमजला व्यावसायिक वापरासाठी राखीव असणार आहे. तिथे बँकेसह इतर व्यावसायिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
  • या वसतिगृहात ४०० विद्यार्थी राहू शकणार असून एका व्यक्ती, तसेच दोन वा त्यापेक्षा अधिक व्यक्ती राहू शकतील अशी खोल्यांची रचना करण्यात येणार आहे.
  • खोल्यांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून या इमारतीत खानावळही असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accommodation for 400 students in kalachowki mumbai ssh

ताज्या बातम्या