मुंबई : दोन वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर एका वर्षात अभ्यासक्रम सोडण्याची वेळ आल्यास आता अध्ययनाचे एक वर्षही प्रमाणित होणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच पदवीला शिकलेल्या विषयांशिवायही दुसऱ्या विषयांतून पदव्युत्तर पदवी घेण्याचीही मुभा मिळणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणात अभ्यासक्रम, शिक्षणातील लवचिकतेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कोणत्याही टप्प्यावर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा आणि अभ्यासक्रम सोडण्याचा पर्याय (मल्टीपल एन्ट्री-एक्झिट) विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आता विद्यापीठ अनुदान आयोगाने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची श्रेयांक प्रणाली (क्रेडीट सिस्टिम) जाहीर केली असून विद्यार्थ्यांना मल्टीपल एन्ट्री-एक्झिटचा पर्याय देण्यात आला आहे. दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षानंतर पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी विद्यार्थ्यांना एका वर्षानंतर अभ्यासक्रम सोडावा लागल्यास ते वर्षही शैक्षणिक प्रगतीत ग्राह्य धरले जाईल.

हेही वाचा…पोलिसांच्या बँडपथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा

अभ्यासक्रम बदलण्याची मुभा

आतापर्यंत ज्या विषयातील पदवी घेतली असेल किंवा पदवीचे शिक्षण घेताना शिकलेल्या विषयांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येत होता. मात्र, नव्या रचनेमध्ये पदवीपर्यंत न शिकलेल्या विषयांतही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांलाही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. म्हणजेच मानसशास्êतील पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना साहित्य विषयांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची मुभा मिळेल. मात्र असा प्रवेश घेताना त्या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. विज्ञान- तंत्रज्ञान शाखेतील कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमई, एम.टेक) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकेल.