मुंबईः हुंड्यावरून होणार्‍या वादातून २६ वर्षांच्या महिलेची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी पतीला कफ परेड पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी पतीला काही तासांत कफ परेड पोलिसांनी अटक केली. अरुणकुमार रामचंद्र शर्मा असे आरोपीचे नाव असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अंशुकुमारी अरुणकुमार शर्मा (२६) असे मृत महिलेचे नाव असून कफ परेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, शंकर भगवान मंदिराजवळील विठ्ठलवाडीतील दुसर्‍या मजल्यावरील सदनिकेत ती राहत होती. तक्रारदार कुंदनकुमार उपेंद्र शर्मा मुळचा औरंगाबादमधील बालगुंज बरंडी, कौडियारी येथील रहिवासी आहे. मृत अंशकुमारी ही त्याची बहीण होती. अंशुकुमारीचा २४ मे रोजी अरुणकुमारबरोबर विवाह झाला होता. विवाहानंतर ती कफ परेड येथील तिच्या माहेरी आली होती. मात्र लग्नात हुंडा दिला नाही म्हणून अरुणकुमारला राग आला होता. याच कारणावरून तो अंशकुमारीचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता. माहेरहून हुंडा आणण्यासाठी त्याने तिच्यामागे सतत तगादा लावला होता. तसेच तो तिला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. गरोदरपणातही त्याने तिला प्रचंड क्रुर वागणूक दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून तो तिचा जास्तच छळ करीत होता. दोघांमध्ये मंगळवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. या वादानंतर त्याने तिला बेदम मारहाण करून तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो प्रचंड घाबरला आणि त्याने तेथून पलायन केले.

हेही वाचा – म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२४ : लवकरच विजेत्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण, विजेत्यांना सोमवारपासून तात्पुरते देकारपत्र

हेही वाचा – Worli Assembly Elections: आदित्य ठाकरेंना वरळीत शिंदे गटाकडून तगडं आव्हान; माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा निवडणुकीच्या रिंगणात

स्थानिक रहिवाशांकडून घटनेची माहिती मिळताच कफ परेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अंशकुमारीला जवळच्या जी. टी. रुग्णालायत दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृत्यूची माहिती तिच्या औरंगाबाद येथील कुटुंबियांना देण्यात आली. त्यानंतर तिचा भाऊ कुंदनकुमार शर्मा मुंबईत आला. त्याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली. हुंड्यावरून आपली बहीण अंशकुमारीचा पती अरुणकुमार सतत छळ करीत होता, असे कुंदनकुमारने जबानीत सांगितले. याच कारणावरून अरुणकुमारने तिची हत्या केल्याचे कुंदनकुमारने तक्रारीत नमुद केले. त्याच्या तक्रारीवरून अरुणकुमार शर्मा याच्याविरुद्ध पोलिसांनी १०३ (१), ८०, ८५, ११५ (२), ३५२ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अरुणकुमार शर्माला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर गुरुवारी आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Story img Loader