मुंबईः गेल्या २० वर्षांपासून फरार असलेल्या सदोष मनुष्यवधाचा आरोप असलेल्या आरोपीला अखेर शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली. सुरेशकुमार फुलचंद वैश्य असे या आरोपीचे नाव असून आरोपीला गुजरातमधून अटक करण्यात आली. आरोपीविरोधात २००६ मध्ये सत्र न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट जारी केले होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर शिवाजी पार्क पोलिसांच्या विशेष पथकाने मोठ्या शिराफीने त्याला अटक केली.

आरोपी मुंबईबाहेर गेल्याचा संशय

आरोपी सुरेशकुमार फुलचंद वैश्य विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भारतीय दंड संदिता कलम २७९, २२७ व ३०४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेला होता. तपासात सुरेशकुमार अॅन्टॉप हिल येथील शीव कोळीवाडा, कोकरी आगाराजवळील जय महाराष्ट्र नगरात राहत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले होते. आरोपीच्या घरा शेजारी पानाचे दुकान होते. तेथे आरोपी नेहमी यायचा. पोलिसांनी त्याच्याकडेही आरोपीबाबत चौकशी केली असता तो पळून गेल्याचे निष्पन्न झाले. त्याचा कसून शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नाही. त्याने मुंबई सोडल्याचा पोलिसांना संशय होता. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश नुकतेच पोलिसांना दिले होते. त्याअंतर्गत शिवाजी पार्क पोलिसांनीही आरोपीचा पुन्हा शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. पोलीस पथकाने आरोपीच्या जुन्या ठिकाणांवर जाऊन माहिती घेतली.

आरोपी गुजरातला पळाल्याचे समजले

या शोध मोहिमेत आरोपी गुजरातमधील वडोदरा येथे राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस पथक वडोदरा येथे रवाना झाले आणि त्यांनी तेथे साध्या वेशात पाळत ठेवली. ओळख पटताच पोलिसांनी वडोदरा येथील न्यू व्हीआयपी रोड, खोडियारनगर-गणेश नगर येथून आरोपीला ताब्यात घेतले. या पथकात पोलीस हवालदार पाटील आणि पोलीस शिपाई केवट यांचा समावेश होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता संबंधित व्यक्ती फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला दादर येथील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी त्याला पुन्हा अटक करून सोमवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला याप्रकरणी १४ दिवसांची न्यायलयीने कोठडी सुनावली. कोणतीही ठोस माहिती हाती नसताना पोलिसांनी विशेष मोहीम राबवून आरोपीला गुजरातमधून अटक केली.