मुंबईः माझगाव येथील ५३ वर्षीय महिला गुलशन खान यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी झैद हुसैन खान या आरोपीला दिल्लीतून अटक केली. तो गेल्या एक महिन्यापासून पोलिसांचा समेमिरा चुकवून पळ काढत होता. न्यायालायाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
माझगाव येथे राहणाऱ्या गुलशन खान (५२) या महिलेने तिचा पुतण्या शोएब इम्तियाज खान उर्फ बोबडा (२७) याच्याशी २०२२ मध्ये दुसरे लग्न केले होते. पतीचे घर सोडून जाताना गुलशनने घरातून ६५ तोळे सोने घेतले होते. लग्नानंतर गुलशनचा पती शोएब, दिर आणि सासू तिचा छळ करत होते. गुलशन ६ एप्रिल रोजी राहत्या घरातून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला होता. सुरूवातील पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून आत्महत्येची नोंद केली होती. मात्र तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीने गुलशनच्या हत्येची शंका वर्तवली होती. त्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तपासणीत महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांना घरातील शौचालय, दरवाज्यावर आणि चप्पलवर रक्ताचे डाग आढळले होते. पोलिसांनी हे पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर गुलशनची हत्या झाल्याचे उघड झाले. या प्रकरणात झैद आणि रोशन खान यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्याचा जामिन अर्ज न्यायालायने फेटाळल्यानंतर झैद खान फरार झाला होता आणि दिल्लीतील विविध हॉटेल व ओळखीच्या लोकांच्या घरांमध्ये सतत ठिकाण बदलत होता. अखेर अग्रीपाडा पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली.
या प्रकरणाशी संबंधित घडामोडीत, कुटुंबाचा चालक देखील अटकेत घेण्यात आला आहे. त्याच्यावर मृत महिलेच्या घरी असलेली महत्वाची कागदपत्रे आणि एक पिशवी त्याच्या मालकाच्या सांगण्यावरून तेथून हटवल्याचा आरोप आहे. ते पुरावे एका इमारतीच्या वाहन तळातून पार्किंगमधून हस्तगत करण्यात आली. याप्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १०८, ३५१(२), आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी शोएब खानने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र त्याने नंतर तो अर्ज मागे घेत अग्रीपाडा पोलिसांसमोर २४ मे रोजी शरणागती पत्करली. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. आरोपीची कोठडी मिळाली आहे. त्याच्या चौकशीतून मिळणारी माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिलेची आत्महत्या केली नसून आरोपींनी कट रचून तिची हत्या केल्याचा संशय असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.