मुंबई – न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकतील १२२ कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने लखनऊ येथून पवन अमरसिंह जैस्वाल (वय ४७) या आरोपीला शनिवारी अटक केली आहे. ही या प्रकरणातील नववी अटक आहे. पवन जैस्वाल हा मूळचा झारखंडचा रहिवासी असून तो बांधकाम साहित्य पुरवठादार आहे. तपासादरम्यान पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपींच्या बँक व्यवहारांचा तपशील तपासला असता जैस्वालच्या बँक खात्यात फसवणूकीतील सुमारे साडे तीन कोटी रुपये जमा झाले होते. त्याच्या अटकेनंतर त्याला मुंबईतील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी प्रथम बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. मेहताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला पोलिसांनी अटक केली.
अपहाराच्या रक्कमेतील ७० कोटी रुपये मेहताने पौनला दिल्याचा संशय आहे. गैरव्यवहार सुरू असतानाही त्याच्याकडे कानाडोळा करणारे बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदर भोअन यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर मनोहर अरुणाचलम, कपिल देढिया वअरूणाचलम उन्ननाथ यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जैस्वालला पकडून ९ आरोपींना अटक केली आहे.