मुंबईः चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी व त्याच्या कुटुंबियांनी गोंधळ घातल्याचा प्रकार चुनाभट्टी पोलीस ठाण्यात घडला. आरोपी अक्षय बापू गायकवाड या तरूणाने स्वतःकडील ब्लेडने गळ्यावर वार केला. तसेच स्वतःचे डोके भींतीवर आपटून घेतले. त्याला चिथावणी देणाऱ्या व पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या कुटुंबियांविरोधातही सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसला
चेंबूर येथील लाल डोंगर परिसरातील आशापुरा इमारतीतील एका सदनिकेचे कुलुप तोडण्यात आले होते. अज्ञात चोराने आत प्रवेश करून तेथील मालमत्तेची चोरी केली होती. याप्रकणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्हींची तपासणी केली असता आरोपी अक्षय गायकवाड साथीदारांसह संशयीतरित्या चोरी झालेल्या ठिकाणी वावरताना दिसला. खबऱ्यांनीही गायकवाड व त्याच्या साथीदारांनी चोरी केल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्याच्याबाबत माहिती घेतली. त्यावेळी तो रात्रीच गावी गेल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांंचा संशय बळावला. आरोपी बुधवारी परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तेथे जाऊन त्याला चोरीच्या गुन्ह्यांची माहिती दिली व त्याबाबत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात सोबत येण्यास सांगितले.
कारवाई टाळण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांनी अक्षयला पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी सुरू केली. यावेळी त्याच्या मागून वडील बापू गायकवाड, भाऊ रितीक गायकवाड व आई आशा गायकवाडही पोलीस ठाण्यात पोहोचले. त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी आले. त्यानंतर गुन्ह्यांतील सहभाग स्पष्ट होत असल्याचे पाहून अक्षयने त्याच्या कमरेला लावलेल्या ब्लेडने स्वतःच्या गळ्यावर वार करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांना ढकलून दिले व कपडे फाडून भांडरगृहाजवळील भींतीवर स्वत:चे डोके आपटण्यास सुरूवात केली. तक्रारीनुसार, वडिलांनीही पोलिसांना धमकावले. तसेच आरोपीला स्वतःला ब्लेड मारून घेण्यास सांगितले. त्यांनी तेथील पोलिसांना नोकऱ्या घालवण्याची धमकी दिली. भाऊ रितीक व आई आशा यांनीही पोलीस ठाण्यात गोंधळ घातला.
चौघांवर अटकेची कारवाई
चुनाभट्टी पोलीस ठाण्यात आरोपींनी गोधळ घातल्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस शिपाई सुचेंद्र शेटे यांच्या तक्रारीवरून चौघांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली. पोलिसांना धमकावणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे विविध आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.