मुंबई : व्यावसायिक शत्रुत्वामुळे ‘बॉम्बे डाइंग’चे तत्कालीन प्रमुख नस्ली वाडिया यांच्या हत्येचा कथित कट रचल्याचा आरोप असलेल्या आरोपीने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना खटल्यात साक्ष देण्यासाठी पाचारण करण्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली. न्यायालयाने आरोपीच्या अर्जाची दखल घेऊन केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) त्यावर उत्तर देण्याचे आदेश दिले.
१९८८ मधील प्रकरणातील आरोपी इव्हान सिक्वेरा याने विशेष सीबीआय न्यायालयासमोर अर्ज केला आहे. त्यात त्याने अंबानी यांना साक्षीदार म्हणून पाचारण करण्याची आणि त्यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने २००३ मध्ये कीर्ती अंबानी, अर्जुन बाबरिया, सिक्वेरा आणि रमेश जगोठिया यांच्यावर वाडिया यांच्या हत्येसाठी कथित कट रचल्याचा आरोप निश्चित केला होता. या आरोपींपैकी दोघांचा खटला प्रलंबित असतानाच मृत्यू झाला होता. तर अन्य दोन आरोपी जामिनावर आहेत.




कीर्ती अंबानी हा अंबानी समूहाच्या मालकीच्या कंपनीत वरिष्ठ अधिकारी असल्याचे म्हटले जात होते. तसेच त्याच्यावर गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. कीर्तीचा २०१७ मध्ये मृत्यू झाला आहे. या प्रकरणात २०१६ मध्ये वाडिया हे साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, आपणच खरे पीडित आहोत, असा दावा सिक्वेराने केला असून कटासंदर्भात माहिती देण्यास तयार असल्याचे त्याने म्हटले आहे.