मुंबई : अंधेरी येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे धमकावून बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने या मुलीची अश्लील छायाचित्रे इन्स्टाग्रामवर प्रसारित करून तिची बदनामी केल्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती.
पीडित तरुणी १७ वर्षांची आहे. मागील वर्षी जून महिन्यात तिची ओळख नालासोपारा येथे राहणाऱ्या तरुणाबरोबर झाली होती. त्याने तिच्यासोबत मैत्री केली आणि तिला नोव्हेंबर २०२४ मध्ये नालासोपाऱ्यातील आपल्या घरी नेले. त्यावेळी त्याने पीडितेच बळजबरीने चुंबन घेऊन त्याचे छायाचित्र काढले. या छायाचित्राच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करू लागला. हे छायाचित्र कुटुंबियांच्या व्हॉटस ॲपवर पाठवण्याची, तसेच चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे पीडित तरुणी घाबरली होती. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्याकडून बळजबरीने अश्लील छायाचित्रे मागून घेतली. ही अश्लील छायाचित्रे वायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
पीडितेने दबावापोटी हा अत्याचार सहन केला होता. या प्रकाराला कंटाळून तिने त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने तिची अश्लील छायाचित्रे इन्स्टाग्रामवर प्रसारित केली. त्यामुळे पीडितेने कुटुंबियांना हा प्रकार सांगितला आणि अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अत्याचाराची पहिली घटना नालासोपारा येथे घडल्याने हे प्रकरण नंतर तेथील पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यातील (पोक्सो) कलम ४, ८, १२, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क), ६७ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे.
आरोपीला बुधवारी पेल्हार पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २३ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आम्ही आरोपीचा मोबाईल जप्त केला असून तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी पाठवणार आहोत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले.