मुंबई : खासदाराचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करून कुलाब्यातील प्रसिद्ध बडे मियाँ हॉटेलच्या मालकाची ११ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपी सुरज कलव (३०) याला काळाचौकी पोलिसांनी अटक केली. कलव याच्या विरोधात काळाचौकी, शिवाजी पार्क आणि विक्रोळी पोलीस ठाण्यात एकूण चार फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.

बडे मियाँ हॉटेलचे मालक जमाल मोहम्मद यासीन शेख (५४) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पावसाळी अधिवेशन सुरू असताना २ जुलैच्या रात्री त्यांना आरोपी सुरजने दूरध्वनी केला. त्याने खासदार अरविंद सावंत यांचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करत जेवण मागवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने वेळेत पैसे दिले. त्यानंतर मात्र त्याने जेवण मागवत जेवणाचे दोन लाख रुपये अधिवेशन संपल्यावर देईन असे सांगितले. जमाल शेख यांची २० वर्षीय मुलगी वांद्रे येथील महाविद्यालयात विधी विषयाचे शिक्षण घेत आहे. तिला महाविद्यालयात ये-जा करणे कठीण होत असल्याने जमाल शेख यांनी याविषयी सुरजला सांगितले. सुरजने मुलीला चर्चगेट येथील शासकीय विधी महाविद्यालयाध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण नऊ लाख २७ हजार रुपये उकळले.

हेही वाचा >>>तुरूंगातील ई-मुलाखत, दूरचित्रसंवाद प्रणालीच्या सुविधांची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

 त्यानंतर, मात्र आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने जमाल शेख यांनी काळाचौकी पोलीस ठाणे गाठून फसवणूकीची तक्रार दिली आहे. आरोपी सुरज हा करी रोड येथील मातृछाया इमारतीमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. सूरज हा वाहनचालक असून त्याने अशाप्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.