मुंबई : निसर्गाच्या जवळ राहणाऱ्या प्राण्यांना कधीही औषधोपचारांची गरज पडत नाही. जंगलातील पशु – पक्षी किंवा खोल समुद्रातील मासे हे निसर्गाच्या सानिध्यात राहत असतात आणि निसर्गाने ठरवून दिलेले अन्न खात असतात. आपण मूळ भारतीय संस्कृतीनुसार निसर्गाशी जोडलेले राहायला हवे, आपण जितके निसर्गाशी जोडले जाऊ, तितके सुखी आणि निरोगी राहू, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गुरुवारी व्यक्त केले.

वांद्रे येथील जिओ कन्विशनल वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई क्लायमेट वीक’ या तीन दिवसीय उपक्रमाची सांगता गुरुवारी झाली. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपले विचार व्यक्त केले.

चंगळवादी प्रवृत्तीमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. आपण आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा नाश करत आहोत, चंगळवादी प्रवृत्तीपेक्षा निरोगी आरोग्य महत्त्वाचे असून त्यासाठी आपण आपल्या मूळ भारतीय संस्कृतीनुसार निसर्गाशी जोडलेले राहायला हवे,, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

सेंद्रिय शेती आणि आरोग्य याविषयी बोलताना राज्यपाल म्हणाले की, या पृथ्वीवर असंख्य जीव आहेत. पण त्या सर्वच जीवांसाठी रुग्णालये, डॉक्टरांची व्यवस्था आणि औषधांची दुकाने नाहीत, तरीही ते जीव निरोगी आहेत. निसर्गाशी एकरूप होऊन जगतात. मात्र, माणसांच्या सान्निध्यात आलेले गाढव, कुत्रा, घोडा, बकरी आणि गाय यांसारखी जनावरे मात्र आजारी पडतात. आकाशात मुक्त विहार करणारे पक्षी किंवा खोल समुद्रात राहणारे मासे क्वचितच आजारी पडतात. आपण कधी एखाद्या गायीला चष्मा लावलेला पाहिला आहे का ? किंवा घोडा टूथपेस्टने दात घासत आहे असे पाहिले आहे का ? नाही. कारण ते निसर्गाने ठरवून दिलेले अन्न खातात. माणूस मात्र, रासायनिक खतांवर पिकवलले, कीटकनाशके फवारलले अन्न खातात. यामुळे गंभीर आजारात वाढ झाली असून सर्वांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आचार्य देवव्रत यांनी यावेळी व्यक्त केली.

पर्यावरणाचे रक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी

आपण निसर्गापासून दूर जात आहोत. यामुळे आपल्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. निसर्ग संवर्धनाबाबत आता सावध झालो नाही, तर येणाऱ्या काळात आपल्याला गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागेल, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगतानाच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा वापर करण्याचा संदेश दिला.